‘बीसीसीआय’ अध्यक्षांचे प्रशासकीय समितीला विनंतीपत्र
‘कॉफी वुइथ करण’ या टीव्ही कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांची चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निलंबन उठवून खेळण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी प्रशासकीय समितीकडे केली आहे.
‘‘पंडय़ा आणि राहुल यांच्याकडून चूक झाली आहे. याबद्दल त्यांचे निलंबन करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारीसुद्धा बोलावण्यात आले आहे. याचप्रमाणे दोघांनीही बिनशर्त माफीसुद्धा मागितली आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत दोघांनाही भारतीय संघाकडून खेळण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघात ते सहभागी होऊ शकतील,’’ असे खन्ना यांनी प्रशासकीय समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
पंडय़ा आणि राहुल यांच्या चौकशीसाठी लवाद अधिकारी नेमण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यास खन्ना यांनी इन्कार केला आहे. पंडय़ा-राहुल यांची चौकशी प्रलंबित आहे. कारण चौकशीसाठी लवाद अधिकारी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त करावा, अशी मागणी ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीने केली आहे.
‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या विश्वासातील १४ राज्य संघटनांनी खन्ना यांच्याकडे तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली आहे. जेणेकरून सर्वसाधारण सभा लवाद अधिकारी नेमू शकेल.
ही सभा १० दिवसांत बोलावता येते. कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनीही खन्ना यांना सभेची मागणी करणारे पत्र दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आपण कोणतीही भूमिका घेणे उचित ठरणार नाही. कारण त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकेल, असे उत्तर खन्ना यांनी या सर्वाना दिले आहे.