एकतर्फी झालेल्या लढतीत पुणे फुटबॉल क्लबने मुंबईच्या एअर इंडियाचा ६-० असा धुव्वा उडविला आणि आयलीग फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजय नोंदविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या लढतीत पुण्याच्या खेळाडूंनी धारदार आक्रमण करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. पुण्याच्या विजयात जेम्स मोगा याने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने ३० व्या व ६७ व्या मिनिटाला गोल केले. बोएमा कर्पेह (२६ वे मिनिट), दौहो परेरा (५२ वे मिनिट), जेजे लाल्पेखातुआ (७४ वे मिनिट) व निखिल कदम (८६ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत जेम्सला चांगली साथ दिली. पूर्वार्धात पुणे संघाने २-० अशी आघाडी घेतली होती.
या सामन्यातील विजयासह पुण्याचे ४३ गुण झाले आहेत. ते अद्यापही तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. एअर इंडियाच्या १९ गुणांमध्ये वाढ होऊ शकली नाही.
एअर इंडियाने एकाही परदेशी खेळाडूला संधी न देता भारतीय खेळाडूंवरच आपली भिस्त ठेवली होती. त्यामुळेच की काय आक्रमण व बचाव या दोन्ही आघाडय़ांवर त्यांना अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नाही. त्याचा फायदा पुणे क्लबला झाला. पुण्याने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळविले होते, तथापि त्यांना खाते उघडण्यासाठी २६ मिनिटे वाट पाहावी लागली. पहिला गोल झाल्यानंतर पुण्याच्या आक्रमणास आणखीनच धार आली आणि शेवटपर्यंत त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला.
पुणे क्लबचे प्रशिक्षक डेरेक परेरा यांनी सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, या सामन्यातील एकतर्फी विजयामुळे मला खूप समाधान झाले आहे. आमच्या खेळाडूंनी चांगला समन्वय दाखवित निर्विवाद वर्चस्व गाजविले. मोठय़ा विजयामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचा फायदा आम्हास उर्वरित लढतींकरिता निश्चित होईल.
एअर इंडियाचे प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी खेळाडूंच्या खराब कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पुण्याचे पारडे जड होते तरीही आम्ही एवढा लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. आमच्या खेळाडूंनी थोडासा समन्वय दाखविला असता तर आम्ही किमान दोन गोल करू शकलो असतो. या सामन्यापासून आमचे खेळाडू बोध घेतील अशी अपेक्षा आहे. पुण्याच्या खेळाडूंनी खूपच सुरेख सांघिक खेळ केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा