शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पुणे क्लबने बलाढय़ मोहन बागान संघाविरुद्ध २-० अशी आघाडी असतानाही बरोबरी स्वीकारली आणि आयलीग फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजय मिळविण्याची संधी दवडली. बागान संघाच्या ओडाफा ओकोली याने दोन्ही गोल करीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
सामन्याच्या ३० व्या मिनिटाला पुण्यास फ्रीकिक मिळाली. त्यावर डुडी परेरा याने मारलेला चेंडू गोलपोस्टवर आदळून परत आला, तथापि परेराचा सहकारी चिका वाली याने शिताफीने चाल करीत हा चेंडू गोलमध्ये तटविला.
 या गोलच्या आधारे पुण्याने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली होती. ७५व्या मिनिटाला अराटा इझुमी याने पुण्याचा दुसरा गोल नोंदविला. त्या वेळी हा सामना पुण्याचा संघ जिंकणार असे वाटत होते, मात्र शेवटच्या दहा मिनिटांमध्ये बागान संघाच्या खेळाडूंनी धारदार आक्रमण करीत सामन्यास कलाटणी दिली. ७७व्या मिनिटाला पुण्याच्या बचावफळीतील शिथिलतेचा फायदा घेत बागान संघाच्या ओडाफा ओकोली याने गोल केला. पुन्हा ८४व्या मिनिटाला त्यानेच जोरदार चाल केली आणि दुसरा गोल नोंदविला. पुण्याचे आता आठ सामन्यांअखेर ११ गुण झाले आहेत, तर बागान संघाने नऊ सामन्यांत १२ गुण मिळविले आहेत.