पुण्याच्या सौम्या स्वामीनाथन हिने जी. के. मोनीषा  हिच्यावर मात करत ४०व्या राष्ट्रीय महिला चॅलेंजर्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवर मोहोर उमटवली.
सौम्याला राष्ट्रीय विजेतेपद मिळवण्यासाठी ११व्या आणि अंतिम फेरीत विजयाची आवश्यकता होती. तिने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना ३३व्या चालीत विजय साकारला. सौम्याने नऊ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. दुसऱ्या मानांकित सौम्याने अव्वल मानांकित पद्मिनी राऊत हिला नमवून शुक्रवारी अव्वल स्थानी झेप घेतली होती. तिच्यापाठोपाठ मोनीषा आणि नीशा मोहोता अध्र्या गुणाने मागे होत्या. अव्वल पटावर सौम्या आणि मोनीषा यांच्यात लढत रंगल्यानंतर सौम्याने बाजी मारली. नीशा मोहोताला सौम्याला मागे टाकता आले नाही.
‘‘या स्पर्धेतील निकाल माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे विजेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. शेवटच्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवून मी जेतेपद पटकावले,’’ असे सौम्याने सांगितले. सौम्याने ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत सात विजय मिळवून दोन डाव बरोबरीत सोडवले.