रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या ललिता बाबर या सातारच्या खेळाडूची यंदाच्या पुणे मॅरेथॉन शर्यतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. ही शर्यत सहा डिसेंबर रोजी येथे आयोजित केली जाणार असून परदेशी खेळाडूंच्या गटात फक्त शंभर खेळाडूंनाच स्थान दिले जाईल.
शर्यतीचे संयोजन सचिव प्रल्हाद सावंत यांनी येथे ही घोषणा केली. या शर्यतीसाठी पूर्ण मॅरेथॉन (४२.१९५ किलोमीटर), अर्धमॅरेथॉन (२१ किलोमीटर) या मुख्य शर्यतींबरोबरच पुरुष व महिला गटाकरिता १० किलोमीटर अंतराचीही शर्यत होणार आहे. त्याखेरीज पुण्याच्या खेळाडूंसाठी पाच किलोमीटर अंतराची स्वतंत्र शर्यत घेतली जाईल. या विविध शर्यतींबरोबरच साडेतीन किलोमीटर अंतराची चॅरिटी दौड आयोजित केली जाणार आहे. अपंग, व्हीलचेअर गटासाठीही शर्यत होणार आहे तसेच कुमार गटाकरिता राज्य स्तरावर धावण्याची शर्यत घेतली जाणार आहे. कुमार व अपंगांच्या विविध गटाकरिता नोव्हेंबरमध्ये प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
यंदा मुख्य शर्यतीस खंडुजीबाबा चौकातून प्रारंभ होणार आहे. शर्यतीचा मार्ग नवीन असला, तरी शर्यतीची सांगता नेहरू स्टेडियमवरच होईल. अधिक माहितीसाठी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट, मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२४४२८३९०) या ठिकाणी संपर्क साधावा.

Story img Loader