कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) होणार आहे. आयपीएलच्या सहाव्या मोसमासाठी ३ फेब्रुवारीला होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात मायकेल क्लार्कवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता असून मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया हे दोन संघ क्लार्कला विकत घेण्यासाठी शर्यतीत असल्याचे समजते. मुंबई किंवा पुणे संघाकडे क्लार्क गेल्यास या संघाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येणार आहे.
भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार असून गेल्या मोसमात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्व सांभाळले होते. मुंबईने या मोसमासाठी कर्णधार बदलण्याचे संकेत दिले असून पुणे वॉरियर्सने याआधीच गांगुलीची मुक्तता केली आहे. पुणे संघाला क्लार्कला आपल्या संघात कायम राखता येणार नाही. कारण बदली खेळाडू म्हणून क्लार्कने गेल्या वर्षी पुणे संघाशी करार केला होता. आयपीएलच्या नियमानुसार, अशा खेळाडूचा लिलावात समावेश केला जातो. सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी मुंबईकडे १८ लाख ८ हजार २६१ डॉलर तर पुण्याकडे ३९ लाख ६२ हजार ८२६ डॉलर जमा आहेत. त्यामुळे मुंबईपेक्षा पुणेच वरचढ ठरेल, अशी चिन्हे आहेत.
‘‘गेल्या मोसमात क्लार्कने ऑस्ट्रेलियासाठी सुरेख कामगिरी केल्यामुळे कर्णधाराचा विचार डोक्यात ठेवूनच क्लार्कवर बोली लावण्यात येणार आहे. पुणे वॉरियर्सच्या पहिल्या मोसमात युवराज सिंगने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या वर्षी तो आजारपणामुळे आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे युवराज कर्णधारपदाच्या शर्यतीत नाही,’’ असे पुणे वॉरियर्स संघातील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader