समतोल संघ व चांगला सराव याच्या जोरावर आम्ही महाकबड्डी लीगमध्ये विजेतेपद मिळवू, असा आत्मविश्वास पुणे पँथर्स पुरुष संघाचा कर्णधार विराज लांडगे व महिला संघाची कर्णधार पूजा केणी यांनी येथे व्यक्त केला. या स्पर्धेस १५ मे रोजी मुंबई येथे प्रारंभ होत आहे.
पुणे पँथर्स फ्रँचाइजी संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी येथे या संघाचे मालक प्रकाश बालवडकर, दत्ता बालवडकर व मंगेश मुरकुटे तसेच लीगचे मुख्य प्रवर्तक शांताराम जाधव यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या महिलांचा पहिला सामना १५ मे रोजी बारामती हरिकन्स संघाशी होणार आहे. पुरुष गटातही पुण्याची पहिल्या लढतीत बारामती हरिकन्स संघाशी गाठ पडणार आहे. हा सामना १६ मे रोजी होईल. दोन्ही विभागांच्या साखळी गटात पुण्यास बारामती, रत्नागिरी, सांगली यांच्याशी खेळावे लागणार आहे. अन्य गटांत मुंबई, रायगड, ठाणे, अहमदनगर यांचा समावेश आहे.
पुण्याचा कर्णधार विराज लांडगे याने सांगितले की, ‘‘या स्पर्धेसाठी आम्ही ५ मेपासून सराव सुरू केला आहे. संघात उत्कृष्ट चढाईपटू व पकडी करणारे खेळाडू असल्यामुळे आमचा संघ अतिशय समतोल झाला आहे. राज्यस्तरावरील ही पहिलीच लीग असल्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करील अशी मला खात्री आहे. राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले नैपुण्य सिद्ध करण्यासाठी हे चांगले व्यासपीठ मिळाले आहे.’’
महिला संघाची कर्णधार पूजा केणी हिने सर्वोत्तम यश मिळविण्याचा आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले की, ‘‘आम्हाला साखळी गटात तुल्यबळ संघ असले तरी आम्ही विजेतेपद मिळविण्यासाठीच खेळणार आहोत. संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही. आमच्याकडे आक्रमक चढाया करणाऱ्या तसेच जोरदार पकडी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.’’
दोन्ही संघ-पुरुष-विराज लांडगे (कर्णधार), सचिन पाटील, सुहास वघरे, मंगेश भगत, परेश चव्हाण, सुनील शिवतरकर, शिवम कुंभार, गणेश लोखंडे, बिभीषण जगदाळे, अक्षय जाधव, प्रशिक्षक-हनुमंत पवार.
महिला-पूजा केणी (कर्णधार), मीनल जाधव, राणी उपहार, शिवनेरी चिंचवले, सुवर्णा येनपुरे, संगीता येनपुरे, कोमल गुजर, श्रद्धा पवार, पूजा भांडलकर, अंकिता तिकोडे, प्रशिक्षक-बजरंग परदेशी, व्यवस्थापिका-सारिका शिर्के.