पुणेरी यशाचे सप्तक ठाण्यात झालेल्या हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पध्रेच्या महिला गटात पाहायला मिळाले. तथापि, भारताचा क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे सात क्रमांक जोपासणाऱ्या नितीन मदने याने मुंबई उपनगरच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला आणि पुरुष गटात सांगलीला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे मदनेला खांद्यावर घेऊन सांगली संघाने विजयी फेरी मारली, तेव्हा ठाणेकर कबड्डीरसिकांनी या संघाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर डीजेच्या तालावर सांगलीच्या संघाने मैदानावर जल्लोष साजरा केला.
उपांत्य फेरीत जी गत स्नेहल साळुंखेच्या मुंबई शहरची झाली, तीच अंतिम फेरीत अभिलाषा म्हात्रेच्या मुंबई उपनगरची झाली. पुण्याच्या सांघिक ताकदीपुढे एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा खेळ पुरेसा नाही, हेच या लढतींनी सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यातील पहिल्या तीन मिनिटांत अभिलाषा म्हात्रेची पहिल्या तीन मिनिटांत दोनदा पकड झाली. त्यानंतर ८व्या मिनिटालाच उपनगरवर पहिला लोण चढला. याच ठिकाणी सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. मध्यंतराला १८-९ अशी आघाडी मिळवणाऱ्या पुण्याने मग २८-१८ अशा फरकाने आरामात जेतेपदावर नाव कोरले. उपनगरकडून अभिलाषाने २१ चढाया केल्या आणि १४ गुण (६ झटापटीचे + ८ बोनस) मिळवले. तथापि, पुण्याकडून स्नेहल शिंदेने १७ चढायांमध्ये १० गुण (९ झटापटीचे + १ बोनस) मिळवले, तर दीपिका जोसेफने १२ चढायांमध्ये ८ गुण (६ झटापटीचे + २ बोनस) मिळवले. पुण्याकडून रेणुका तापकिरे आणि सायली किरिपाळे यांनी अप्रतिम पकडी केल्या.
महिलांच्या एकतर्फी लढतीच्या तुलनेत पुरुषांची लढत विलक्षण रोमहर्षक झाली. मध्यंतराला सांगलीकडे ६-४ अशी आघाडी होती. परंतु दुसऱ्या सत्रात मुंबई उपनगरने ११-८ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर नितीन मदनेने आपला करिश्मा दाखवत २ गुण मिळवले. इथूनच उपनगरचा पराभवाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मग मदनेने गुणांचा सपाटा लावत उपनगरवर लोण चढवला आणि सांगलीची आघाडी १६-१२ अशी वाढवली आणि त्यानंतर २१-१५ अशा फरकाने आपल्या विजेतेपदावर नाव कोरले. मदने याने २२ चढायांमध्ये ११ गुण (९ झटापटीचे + २ बोनस) मिळवले. त्यांचा काशिलिंग आडके मात्र अपयशी ठरला. त्याला आठही चढायांत एकही गुण मिळवता आला नाही, तर त्याची तीनदा पकड झाली. उपनगरकडून रिशांक देवाडिगा आणि नीलेश शिंदे यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मुंबईच्या महिलांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात                       
पुण्याच्या बलाढय़ आव्हानापुढे मुंबईची ताकद अपेक्षेप्रमाणेच कमी पडली. त्यामुळे पुण्याकडून ४०-१६ अशा फरकाने पराभव पत्करणाऱ्या मुंबईचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या विजयाचे श्रेय स्नेहल शिंदेला द्यायला हवे. तिने १४ चढायांमध्ये (११ झटापटींचे + १ बोनस) १२ गुण कमवले. यापैकी तीन गुण तिने मुंबईची संघनायक स्नेहल साळुंखेला बाद करून मिळवले आणि त्यामुळे त्यांच्यावर तीन लोण चढले. याचप्रमाणे दीपिकाने ११ गुण मिळवले. नवख्या खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबईला प्रशिक्षक दीपक मसूरकर यांच्या मार्गदर्शनाचीही तीव्रतेने उणीव भासली. वैयक्तिक कारणास्तव ते या सामन्याला हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सूत्रांनी दिली. मुंबईकडून एकटय़ा स्नेहलने झुंजार प्रयत्न करीत १० चढायांमध्ये (४ झटापटींचे + ४ बोनस) ८ गुण प्राप्त केले, तर अपेक्षा टाकळेने ३ गुण घेतले. मुंबईची कप्तान स्नेहल साळुंखे म्हणाली की, ‘‘चढाया आणि पकडी या दोन्ही फळीमध्ये मुंबईची भिस्त उदयोन्मुख खेळाडूंवर होती. मुंबई पोलीस संघाच्या खेळाडूंची उणीव मुंबई शहर संघाला तीव्रतेने भासली. त्यामुळेच आम्ही मुंबईचा पराभव टाळू शकलो नाही. उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याला आम्ही आत्मविश्वासाने हरवले. परंतु दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या पुण्यापुढे आमचा निभाव लागला नाही.’’

Story img Loader