सनरायझर्स हैदराबादचे आव्हान
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर स्पध्रेतील आव्हान टिकवण्याची नामुष्की ओढवली आहे. संघात एकाहून एक दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि महेंद्रसिंग धोनीसारखा कल्पक कर्णधार असूनही पुणे संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना आता प्रत्येक सामना जिंकण्याची आवश्यकता आहे आणि मंगळवारी त्यांच्यासमोर विजयरथावर आरूढ असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे.
पुण्याला दहा सामन्यांत केवळ तीनच विजय मिळवता आले असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत, तर हैदराबादने ९ सामन्यांत सहा विजय व तीन पराभवासह दुसरे स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाविरुद्धचा विजय वगळल्यास पुण्यासाठी आयपीएलमधील प्रवास हा मनोबल खच्चीकरण करणारा आहे. घरच्या मैदानावरच त्यांना चार पराभव पत्करावे लागले आहेत. तसेच दुखापतीमुळेही पुण्याच्या अडचणीत वाढ केली आहे. फॅफ डू प्लेसिस, केव्हिन पीटरसन, स्टिव्हन स्मिथ आणि मिचेल मार्श यांना दुखापतीमुळे मायदेशी जावे लागले आहे. त्यांच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून संघात दाखल झालेल्या उस्मान ख्वाजा आणि जॉर्ज बेली यांना अजून छाप पाडण्याची पुरेशी संधी मिळालेली नाही. कमकुवत गोलंदाजी हाही पुण्यासाठी गंभीर विषय आहे.
हैदराबादने रविवारी झालेल्या सामन्यात दोन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या आणि माजी विजेत्या मुंबई इंडियन्सला ८५ धावांत गुंडाळून दणदणीत विजय साजरा केला आहे. त्यामुळे पुण्याविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांना मानस असेल. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या (४५८ धावा) बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवनही जबाबदारीने खेळ करीत आहे. युवराज सिंगच्या आगमनामुळे संघाला अधिक बळकटी मिळाली आहे. मोईझेस हेन्रिक्स हाही महत्त्वाचा वाटा उचलत आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे आशीष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्ताफिझुर रहमान आणि बरिंदर सरण हे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.