थकबाकीदार सहारा ग्रुपने बँक हमी रक्कम भरण्याची सूचना फेटाळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामथ्र्यशाली कार्यकारिणी समितीने पुणे वॉरियर्स संघाची आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतून हकालपट्टी केली आहे. पुणे संघाला वगळण्याच्या निर्णयामुळे आता आयपीएलमध्ये फक्त आठ संघच शिल्लक राहिले आहेत.
‘‘२०१४च्या आयपीएल हंगामासाठी बँक हमी रक्कम न भरणाऱ्या सहारा अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्सबाबत बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. बीसीसीआयकडून त्यांना पाच वेळा सूचना पाठविण्यात आल्या होत्या. ८ ऑक्टोबर २०१३ला त्यांना अखेरची सूचना देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती फेटाळली. या पाश्र्वभूमीवर कार्यकारिणी समितीने बिनविरोधपणे सहारा फ्रेन्चायझीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली. सहाराला मार्च महिन्यात १७०.२ कोटी रुपये बँक हमी रक्कम भरण्याची आवश्यकता होती.