घरच्या मैदानावर कामगिरी सुधारते हा क्रीडा विश्वातला पक्का समज आहे. बहुतांशी संघ, खेळाडू घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात दमदार खेळ करून विजय मिळवतात परंतु प्रो कबड्डी स्पर्धेत दबंग दिल्लीला घरचे मैदान मानवले नाही. तेलुगू टायटन्स संघाने दबंग दिल्लीवर ३९-३५ अशी मात केली. दुसऱ्या लढतीत पुणेरी पलटण संघाने बंगळुरू बुल्सवर ३३-३१ असा निसटता विजय मिळवला.
प्रो कबड्डीचा ताफा कोलकाताहून दिल्लीकडे रवाना झाला. तेलुगू टायटन्सच्या विजयात दीपक हुडा आणि राहुल चौधरी चमकले. दबंग दिल्लीतर्फे सुरजीत नरवालने सर्वाधिक गुणांची कमाई केली. हुडाला सवरेत्कृष्ट चढाईपटू तर तेलुगू टायटन्सचा कर्णधार सवरेत्कृष्ट बचावपटू पुरस्काराने गौरवण्यात आले. बंगाल टायगर्सविरुद्धची सामना गमावल्यानंतर दबंग दिल्लीला या सामन्यात विजय आवश्यक होता. दिल्लीकर चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी करत दबंग दिल्ली संघाचा उत्साह वाढवला मात्र याचे रुपांतर विजयात करण्यात त्यांना करता आले नाही. भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागची उपस्थिती या सामन्याचे आकर्षण होती. मात्र सेहवागच्या हजेरीही दबंग दिल्लीचे नशीब पालटवू शकली नाही. तेलुगू टायटन्सने आक्रमणावर भर देत १९-१० अशी आघाडी मिळवली. हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असलेल्या काशिलिंग आडकेने सुरजीतच्या साथीने सुरेख खेळ करत ही पिछाडी भरुन काढली. मध्यंतराला तेलुगू टायटन्स २३-२८ असा आघाडीवर होता. जयपूर पिंक पँथर्स आणि पाटणा पायरेट्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागलेल्या टायटन्स संघाने आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख मिलाफ करत आगेकूच केली. विजयाचा फरक सातपेक्षा कमी असल्याने दबंग दिल्लीने पराभव होऊनही एका गुणाची कमाई केली.
अन्य लढतीत गुणतालिकेत तळाशी असलेल्या पुणेरी पलटणने बंगळुरू बुल्सला नमवत पहिल्या विजयाची नोंद केली. पलटणचा कर्णधार वझीर सिंग या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यालाच सवरेत्कृष्ट चढाईपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचा सहकारी नितीन मोरे सवरेत्कृष्ट बचावपटू ठरला. बंगळुरूच्या मनजीत चिल्लरने सर्वाधिक गुण मिळवत झुंज दिली. मध्यंतराला बंगळुरूचा संघ १९-१४ असा आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात शानदार पुनरागमन करत पुण्याने विजय मिळवला. पुण्याचा सोमवारी गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या यू मुंबाशी मुकाबला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा