रोमहर्षक लढतीत पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धातील चार गुणांची पिछाडी भरून काढली आणि पाटणा पायरेट्स संघाला ३०-३० असे बरोबरीत रोखले. प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात ही पहिलीच लढत बरोबरीत सुटली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत गुरुवारपासून पुण्यातील प्रो कबड्डीच्या मोसमाला प्रारंभ झाला. लागोपाठ पाच सामने जिंकणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाने सुरुवातीला खेळावर पकड मिळवली. उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत १०व्या मिनिटाला पहिला लोण चढवला. त्या वेळी त्यांनी १२-४ अशी आघाडी घेतली होती. पुण्याच्या खेळाडूंनी पकडी व चढायांबाबत केलेल्या चुका त्यांच्या पथ्यावर पडल्या. एक वेळ पाटणा संघाने १४-४ अशी आघाडी वाढवली होती. मात्र लोण स्वीकारल्यानंतर पुण्याचे खेळाडू खडबडून जागे झाले. घरच्या मैदानावर प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी जिद्दीने खेळ केला. खोलवर चढाया व अचूक पकडी असा खेळ करीत त्यांनी १७व्या मिनिटाला पहिला लोण नोंदवला. पूर्वार्ध संपायला काही सेकंद बाकी असताना बरोबरी करण्याची त्यांनी संधी मिळाली होती, मात्र पाटण्याच्या प्रदीप नरवालची पकड करण्यात पुण्याचे तीन खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे नरवालने पुन्हा संघाला २०-१६ असे अधिक्य मिळवून दिले.
३०व्या मिनिटाला पाटण्याकडे
३०-२६ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर पुण्याच्या खेळाडूंना सूर सापडला. त्यांनी पकडींबाबत संयम व समन्वय ठेवला. त्यातच पाटणा संघाच्या खेळाडूंनी पकडी करण्याबाबत केलेला आततायीपणा पुण्याच्या पथ्यावर पडला. ३५व्या मिनिटाला पाटणाकडे केवळ एकच गुणाची आघाडी होती. ३६व्या मिनिटाला त्यांच्या प्रदीप नरवालने एकाच चढाईत दोन गुणांची कमाई केली. पुण्याच्या अजय ठाकूरने एकाच चढाईत दोन गुण मिळवत ३०-३० अशी बरोबरी साधली. प्रेक्षकांच्या हितासाठी बदल यंदा हे सामने बॉक्सिंग संकुलाऐवजी बॅडमिंटन संकुलात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आसनक्षमतेमध्ये आठशेने वाढ झाली आहे. अर्थात तिकिटांची संख्या वाढून फ्रँचाइजींच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा