आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या दोन दिवस आधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका मजेदार मीमच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. वसीम २०१९ मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडला गेला होता.
४३ वर्षीय वसीम जाफरने ट्विटरवर ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाशी संबंधित एक मीम शेअर केला आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर दिसत असून या फोटोवर लिहिले, ”अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना.” त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गुडबाय आणि थँक्स पंजाब किंग्ज, तुमच्यासोबत राहून खूप आनंद झाला. अनिल कुंबळे आणि टीमला खूप खूप शुभेच्छा.”
याआधी पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलही दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये सामील झाला. तो लखनऊ सुपर जायंट्स या नवीन आयपीएल संघाचे कर्णधारपद स्वीकारणार तो दिसणार आहे. पंजाब किंग्जची गेल्या दोन मोसमातील कामगिरीही विशेष नव्हती. आता २०२२ च्या लिलावापूर्वी संघाने मयंक अग्रवालला १२ कोटी तर युवा गोलंदाज अर्शदीपला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन बंगळुरूमध्ये होणार आहे.