Punjab Kings issued a statement to clarify the confusion over Shashank Singh : आयपीएल २०२४ च्या लिलावादरम्यान खेळाडूंच्या नावांबाबत गोंधळ झाला होता. हा गोंधळ पंजाब किंग्जने शशांक सिंगला विकत घेतल्यावर झाला होता. आता यावर पंजाब किंग्जकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंजाब किंग्जने म्हटले आहे की, लिलावादरम्यान खेळाडू निवडण्यात कोणतीही चूक झाली नाही, ज्या खेळाडूला फ्रँचायझी खरेदी करायचे होते त्यालाच खरेदी करण्यात आले आहे. पंजाब किंग्सच्या या स्पष्टीकरणापूर्वी, दोन समान नावे असल्यामुळे पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटाने चुकीच्या खेळाडूसाठी बोली लावल्याची बरीच चर्चा सुरू होती.
हे संपूर्ण प्रकरण शशांक सिंगच्या लिलावाशी संबंधित आहे. मंगळवारी लिलावाच्या शेवटच्या क्षणांमध्ये शशांक सिंगला विकत घेण्यात आले. अनकॅप्ड भारतीय खेळाडूंसाठी जलद बोलीची फेरी सुरू असताना, लिलावकर्ता मलिकाने शशांक सिंगचे नाव घेताच, पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटाने लगेच बोली लावली. इतर कोणत्याही फ्रेंचायझीने हात वर केला नाही आणि शशांक लवकरच पंजाब किंग्जच्या ताफ्यात सामील झाला. पंजाबने त्याला मूळ किमतीत (२० लाख रुपये) खरेदी केले.
लिलावानंतर, या बोलीच्या संदर्भात एक अहवाल आला की पंजाब किंग्जला जेव्हा आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी लिलावकर्ता मलिकाशी बोली मागे घेण्यासाठी बोलले, परंतु तिने नियमानुसार तसे करण्यास नकार दिला. बुधवारी संध्याकाळी पंजाब किंग्सने या संपूर्ण प्रकरणावर एक निवेदन जारी केले.
हेही वाचा – BBL 2023 : आरसीबीने खरेदी केलेल्या अष्टपैलू खेळाडूवर चार सामन्यांची बंदी, काय आहे कारण? जाणून घ्या
पंजाब किंग्ज काय म्हणाले?
पंजाब किंग्जचे सीईओ सतीश मेनन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, ‘पंजाब किंग्ज हे स्पष्ट करू इच्छितो की हा खेळाडू आमच्या यादीचा भाग होता, ज्याच्यावर आम्हाला बोली लावायची होती. या यादीत एकाच नावाचे दोन खेळाडू असल्याने गोंधळ झाला होता. योग्य शशांकची आमच्या संघात निवड झाल्याचा आम्हाला आनंद आहे.’
हेही वाचा – IPL Auction : रांचीचा ख्रिस गेल, रॉबिनला मिळाले ३.६ कोटी; धोनी म्हणाला होता, “कुणी घेतलं नाही तर मी घेईन…”
यानंतर शशांक सिंगने आपले मत व्यक्त केले. ‘माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.’