आयपीएलचं १५ वं पर्व सुरु होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. त्यामुळे यंदा चषक कोण पटकवणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. तर पंजाब किंग्ज गेल्या १४ पर्वापासून चषक मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे यंदा चषकावर नाव कोरण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरणार आहे. पण माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी पंजाब किंग्जबाबत आपलं मत व्यक्त केल्याने क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
“पंजाब किंग्स हा अशा संघांपैकी एक आहे ज्यांनी अद्याप विजेतेपद जिंकलेलं नाही. या संघात प्रभाव पडेल असा खेळाडू नाही. पण त्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो. कारण जेव्हा जेव्हा संघाकडून अपेक्षा कमी असतात तेव्हा त्यांच्यावरील दबाव कमी होतो. जेव्हा दबाव कमी असतो तेव्हा खेळाडू अधिक मुक्तपणे खेळतात. त्यानुसार पंजाब किंग्ज काही सामन्यांमध्ये सरप्राईज देऊ शकतो, असे मला वाटते. पण तो ट्रॉफी जिंकेल का, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हा टी२० फॉरमॅट आहे आणि तुम्हाला सतत सामने जिंकावे लागतात.”, असं मत माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी स्पोर्ट तकशी बोलताना व्यक्त केलं.
मयंक अग्रवालकडे प्रथमच पंजाब किंग्जची कमान सोपवण्यात आली आहे. पंजाब किंग्ज २७ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संध्याकाळी ७.३० वाजता पहिला सामना खेळेल. आयपीएल २०२२ च्या लिलावात पंजाब किंग्जने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. याशिवाय त्याने शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो सारखे उत्कृष्ट सलामीवीरही घेतले आहेत. एवढेच नाही तर कागिसो रबाडा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ आणि राहुल चहर, राज अंगद बावा यांनाही फ्रँचायझीने चांगल्या किमतीत विकत घेतले आहे.
Women’s World Cup 2022: भारताने एक विजय मिळवला की उपांत्य फेरीत स्थान पक्कं, कसं ते वाचा
पंजाब किंग्ज – मयंक अगरवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तीक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.