ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग याला हेरॉइन सेवन प्रकरणी दोषी ठरविण्याबाबत पंजाब पोलिसांना अपयश आले आहे. विजेंदरच्या केसांची व नखांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पंजाब पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
विजेंदर याला पंजाब पोलिसांनी हेरॉइन सेवन प्रकरणी अडकविण्यासाठी त्याची उत्तेजक चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने विजेंदरची उत्तेजक चाचणी घेतली मात्र त्यामध्ये तो निदरेष आढळल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या केसांची व हाताच्या नखांची तपासणी करावी यासाठी अर्ज केला होता. तथापि अशा तपासणीस विजेंदर याने आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने विजेंदरची यापूर्वीच उत्तेजक चाचणी झाली असल्यामुळे पुन्हा केस व नखांची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त करीत पोलिसांचा अर्ज फेटाळून लावला. या सर्व घडामोडींतून विजेंदरची सहीसलामत सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.