भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन समिती आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी २०१९ वर्ल्डकप नजरेसमोर ठेऊन संघात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्डकपसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाबरोबरच्या मालिकेमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. याच प्रयोगांचा एक भाग म्हणून भारतीय संघाच्या फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचाही प्रयत्न सुरु आहे. कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल याची चाचपणी सध्या सुरु आहे. ‘भारतीय संघाची फलंदाजीची क्रमवारी निश्चित न ठेवता गरजेप्रमाणे खेळाडूंवर जबाबदारी टाकत त्यांना फलंदाजीमध्ये अग्रक्रम देण्याचा विचार आहे,’ असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या तिसऱ्या क्रमांकावर येणार कोहली हा चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विराट चौथ्या क्रमांकावर आल्याने मधल्या फळीतील फलंदाजीला बळ मिळेल असं संघ व्यवस्थापनाचे मत आहे. मात्र विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याच्या प्रयोगाला भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने विरोध दर्शवला आहे. विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवणे चुकीचे ठरेल असे स्पष्ट मत आगरकरने व्यक्त केले आहे.

फलंदाजीमध्ये बदल करुन विराटला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याला आगरकरने विरोध दर्शवला आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयबद्दल आगरकर म्हणतो, ‘विराटच्या कामगिरीची आकडेवारीच बरंच काही सांगते. त्याने ३२ शतके झळकावली आहेत. त्यातील बरीचशी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना झळकावली आहेत. चौथ्या क्रमांकावर खेळतानाही त्याचा खेळ चांगला असतो. पण विराटला चौथ्या क्रमांकावर उतरवणे योग्य वाटत नाही. तुमच्या संघातील सर्वोत्तम फलंदाजाला क्रमवारीमध्ये खाली खेळायला पाठवण्यात काहीच अर्थ नसतो. त्यातही त्याच्या करियरमधील सर्वोत्तम खेळी आणि अनेक पराक्रम त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना केले असतील तर नक्कीच या प्रयोगाला काही अर्थ नाही. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना डावाला आकार देण्याचे काम करतो किंवा धावांचा पाठलाग करताना शेवटपर्यंत टिकून राहतो. त्यामुळे तिसरा क्रमांकाच कोहलीसाठी योग्य आहे.’

स्वत: कोहलीने ‘मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला काहीच अडचण नाही’ असे मत व्यक्त केले असताना आगरकरने मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘विराट स्वत: चौथ्या क्रमांकावर यायला तयार असेल पण संघाच्या दृष्टीने ते फायद्याचे नाही. माझ्यामते के. एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यासाठी विराटला खालच्या क्रमाकांवर खेळावणे चुकीचे ठरेल. सध्या भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असलेल्या दमदार कामगिरीमागे पहिल्या तीन फलंदांचे योगदान हा महत्वाचा मुद्दा असल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे. मधल्या फळीमधील फलंदाजांची कामगिरी चिंतेची बाब आहे हेही खरे पण त्यासाठी विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवणे योग्य वाटत नाही,’ असं आगरकरने इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भारतीय फलंदाजीमधील क्रमवारीतील प्रयोगांबद्दल आपले मत व्यक्त करताना आगरकरने विराटला तिसऱ्याच क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयाची पाठराखण केली.

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाबरोबर सुरु असलेल्या मालिकेत अनेक प्रयोग करताना दिसत आहे. चौथ्या क्रमांकावर विराटला पाठवून त्याचा कसा फायदा होतो याची चाचपणी सध्या संघ व्यवस्थापनाकडू सुरु आहे. विराट चौथ्या क्रमांकावर आल्यास तिसऱ्या क्रमांकावर अंबती रायडू फलंदाजीला उतरुन मुक्तपणे फटकेबाजी करत विराट आणि मधल्या फळीसाठी एक चांगली धावसंख्या उभी करुन देऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader