बिनचेहऱ्याच्या काही कर्तबगार खो-खोपटूंची अन् ऑलिम्पिक पदक विजेत्यांची तोंडओळख आणि त्यांच्या नावगावाची माहिती, खो-खो स्पर्धा-प्रेक्षकांना करून देण्याचा दुग्धशर्करा योग अखेर जमून आला. त्यासाठी मुहूर्त सापडला आठ डिसेंबर २०१२चा. त्याआधीच्या पंचेचाळीस राष्ट्रीय खो-खो स्पर्धात जो मुहूर्त सापडता सापडेना, तो गवसला सेहेचाळिसाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धात. उद्घाटनाच्या दिवशी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या किल्ले-बारामतीत. त्यांचा बहात्तरावा वाढदिवस अवघ्या चार दिवसांवर आलेला असताना आणि त्याचे साक्षीदार होते, बारामतीच्या विद्यानगरीतील स्टेडियम नव्वद टक्के भरणारे सात हजार प्रेक्षक. ज्यात समाविष्ट होते, रेल्वेसह एकतीस राज्य संघटनांचे सुमारे साडेआठशे खेळाडू आणि साठ पंच आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन मंत्री.
बारामतीत खो-खो स्पर्धेप्रसंगी, संयोजनाचे आश्रयदाते असलेल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या कटआऊट्ससह, नामांकित खोखोपटूंची आणि मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव व बंडू पाटील यांच्यासह गेल्या दोन ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांचेही कट आऊट्स लावले जावेत, अशी क्रीडाक्षेत्राची अपेक्षा होती. क्रीडा-पत्रकारांनी ही व्यथा आपल्या लेखणीतून मांडली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे बारामतीकर अध्यक्ष अजित पवार यांनी ती लगेच मांडली. भल्या सकाळी मुंबईतून बारामतीतील खो-खो संघटकांशी संपर्क साधला. त्यांना आदेशवजा सूचना दिल्या. खेळाडूंचे कट-आऊट्स लावण्याचा आग्रह धरला.
पुढाऱ्यांचे कटआऊट्स नको
‘‘उपमुख्यमंत्रीपदाची दुसरी इनिंग आज सुरू करत आहे,’’ अशी सुरुवात त्याच सायंकाळी सहा वाजता, अजितदादांनी केली, ती बारामतीत उभारलेल्या तात्पुरत्या स्टेडियममध्ये बारा मिनिटांच्या आपल्या भाषणात. ‘‘खो-खो स्टेडियममध्ये पुढाऱ्यांचे कटआऊट्स लावू नका, लावले असले तर काढून टाका. स्टेडियम, खेळांची मैदाने यात कटआऊट्स असावेत ते मोठमोठय़ा खेळाडूंचेच,’’ त्यांनी स्पष्टपणे सांगितले. एशियाड-ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिरवण्याची एशियाड-ऑलिम्पिकशी नाते जोडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खो-खो संघटकांना चुकीची दुरुस्ती करण्यास वेळ मिळाला जेमतेम आठ तासांचा हा अवधी जास्त नसला तरी पुरेसा होता. पण इतर अनेक गोष्टींकडेही लक्ष द्यायला लागत असल्यामुळे आणि कामासह अधिकाराचे वाटप उप-समित्यांमार्फत करण्याची पद्धत नसल्यामुळे या उमद्या आदेशाची अंमलबजावणी अर्धवटच झाली.
नेमबाज अभिनव बिंद्रा, पेहेलवान सुशीलकुमार व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचे पाच-सहा फूट उंचीचे व दोन फूट रुंदीचे पोस्टर्सवजा कटआऊट उभे केले गेले. पण बॉक्सर मेरी कोम, नेमबाज गगन नारंग व विजयकुमार, अन् मल्ल योगेश्वर दत्त यांचे फोटो उपलब्ध झाले नाहीत. चार महिन्यांपूर्वीच्या या ऑलिम्पिक पदक-विजेत्यांची, तसेच मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांची छायाचित्रे भर दिवसा आठ तासांत बारामतीकरांना उपलब्ध झाली नाहीत, यावर विश्वास बसत नाही. बारामतीकरांना ही गोष्ट मुळीच शोभादायक नाही.
त्यातूनच आणखी एक विचित्र गफलत घडली, ती अपुऱ्या विचारविनिमयामुळे. हे तिघे ऑलिम्पियन आणि विशेषत: सुरेखा कुलकर्णी-द्रविड, वीणा परब-गोरे, श्रीरंग इनामदार व हेमंत टाकळकर हे चार उपलब्ध अर्जुनवीर (इतर दोघे अर्जुनवीर शेखर धारवाडकर व उषा नगरकर यांची छायाचित्रे अनुपलब्ध!) म्हणजे कोणी कसोटी क्रिकेटपटू नव्हेत. कारण क्रिकेटपटूंची छबी टेलिव्हिजनवर वर्षांतून बारा महिने दिवस-रात्र साऱ्या दुनियेत दिसत असते. अशा या बिगर क्रिकेट व विशेषत: बिगर-ऑलिम्पिक खेळाडूंची नावे लिहिली गेली, ती कट-आऊट्सच्या तळाशी. त्यामुळे कोणालाही दिसत नव्हती.
अनाकलनीय!
जुन्या कार्यकत्यार्चा विशेष गौरव करताना आणि प्रवेशद्वारांसाठी मान्यवर निवडताना गुणवत्ता व कर्तबगारीचा विचार चक्र बाजूला ठेवला गेला. केवळ दीर्घकाळ पदाधिकारी होते (‘संस्थापक’ होते) म्हणून मुकुंद आंबेर्डेकर व भास्कर केरकर यांना दिलेलं झुकतं माप अनाकलनीय होते. धुळ्यात सातदा राष्ट्रीय व अखिल भारतीय स्पर्धाचे संयोजन करणाऱ्या कुशल चमूचे नेते माधव पाटील कुठे आणि कामापेक्षा गोंधळ माजवणारे आंबेर्डेकर कुठे! तीच गोष्ट केरकरांची. त्यांच्या दसपटीने कार्य करणारे शंकरराव पाटणकर, श्रीकांत टिळक, हरिभाऊ सावे, आंबेकर गुरुजी, नरुभाऊ पाटील, डॉ. साळवी, विश्वास कोरे, एकनाथ साटम, आबा नाईक (युवक), भास्कर सावंत, उमेश शेणॉय, रमेश वरळीकर यांच्या तुलनेत केरकर कुठे टिकतात?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा