सिंधू नदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. या नदीच्या खळखळत्या प्रवाहाच्या आधारेच सुजलाम् सुफलाम् संस्कृती उदयास येऊन विकसित झाली. आजही या संस्कृतीच्या पाऊलखुणा इतिहासाच्या मानबिंदूंमध्ये अजरामर आहेत. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या रूपाने विचारी, अथक परिश्रमाची तयारी असणारी, मेहनतीला सातत्याची जोड देण्याची मनीषा असणारी, खेळाप्रती जबरदस्त निष्ठा असणारी खेळाडू भारतीय क्रीडाक्षेत्राला मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने जेतेपदावर कब्जा करत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सायना नेहवाल यशोशिखरे पादाक्रांत करत असतानाच सिंधूने बॅडमिंटनची रॅकेट हाती घेतली. मात्र ‘प्रति सायना’ होण्यापेक्षा सिंधू हीच ओळख कमवायला आवडेल असे सिंधू आवर्जून सांगते. मात्र समकालीन सायनाचे यश तिला खूपत नाही. याउलट सायनामुळेच भारतीय बॅडमिंटनला ओळख मिळाली आहे. तिच्याकडून खेळाचे अनेक बारकावे शिकते आहे, तिचा खेळ नेहमीच प्रेरणादायी असतो असेही ती नमूद करते. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, असं प्रसिद्ध लेखक शिव खेरा यांचं वाक्य आहे. कारकिर्दीच्या प्राथमिक टप्प्यावर असूनही सिंधूच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत लागू पडते.
सिंधूचे आईवडील व्हॉलीबॉलपटू. खेळाचा वारसा पुढच्या पिढीत संक्रमित झालेला. सिकंदराबादमध्ये मोहम्मद अली यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. काही वर्षांतच अली सरांचे निधन झाले आणि सिंधूला सर्वसमावेशक प्रशिक्षणाची आवश्यकता भासू लागली. योगायोगाने असे प्रशिक्षण केंद्र पुल्लेला गोपीचंद यांनी हैदराबादजवळच्या गच्चीबाऊलीजवळ सुरू केले. सिकंदराबादपासून केंद्राचे अंतर ३० किलोमीटर. शाळा, अभ्यास हे सगळं सांभाळून केंद्रात प्रशिक्षणासाठी जाणं जिकिरीचं , मात्र तिने ध्यास सोडला नाही. तिची इच्छाशक्ती आईवडिलांनी जाणली आणि समर्थपणे तिच्या पाठीमागे उभे राहिले. रोज पाच-सहा तास प्रशिक्षण, जाणं-येणं, शाळा, अभ्यास ही सगळी तारेवरची कसरत सिंधू आणि तिच्या कुटुंबीयांनी सांभाळली. आता सिंधूला मिळत असलेल्या यशाचे बीज या खडतर कालखंडात आहे.
गोपीचंद अकादमी आणि स्वत: गोपीचंद सिंधूच्या यशस्वी वाटचालीचा अविभाज्य घटक आहेत. लहान वयातच प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या उंचपुऱ्या सिंधूमधील बॅडमिंटनचे नैपुण्य गोपीचंद यांनी ओळखले आणि तेव्हापासून तिचा खेळ, फटके, डावपेच, तंदुरुस्ती, मानसिक कणखरता या प्रत्येक मुद्दय़ावर प्रचंड मेहनत घेतली. कारकिर्दीला सुयोग्य वळण लावणारा गुरू मिळाल्यामुळे सिंधूनेही गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाबरहुकूम वाटचाल करायला सुरुवात केली. तिला मिळणारे यश या गुरु-शिष्य जोडीच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चमकत असलेल्या सिंधूला प्रगत प्रशिक्षणाची गरज गोपीचंद यांनी ओळखली. गोपीचंद यांच्या सूचनेनंतर सिंधूच्या पालकांनी गोपीचंद अकादमीच्या नजीकच घर घेतले आहे, जेणे करून प्रवासातला वेळ हा वाटचालीतला अडथळा ठरणार नाही.
आतापर्यंतच्या प्रवासात सिंधूने ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त लि झेरूई, सिझियान वांग, वांग यिहान अशा चीनच्या मातब्बर खेळाडूंना नमवले आहे. या विजयांसह चीनची भिंत पार करण्याची गुरुकिल्ली तिने मिळवली आहे. २०१३ वर्ष तर सिंधूसाठी उल्लेखनीय यशाचे आहे. मलेशिया स्पर्धेचे जेतेपद, त्यानंतर जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम तिने नावावर केला. १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी या स्पर्धेत पदकाची कमाई केली होती. त्यानंतर भारताला या स्पर्धेत मिळालेले हे पहिलेच पदक आहे. यावरूनच या पदकाची दुर्मीळता आणि महत्त्व अधोरेखित होते. या दिमाखदार प्रदर्शनासाठीच सिंधूला यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मलेशिया आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर सिंधूची कामगिरी खालावली. त्यानंतर गोपीचंद यांनी सिंधूसाठी एक महिन्याचा विशेष सराव कार्यक्रम आखला. मकाऊ स्पर्धेचे जेतेपद हे याच सराव कार्यक्रमाची परिणिती आहे. कोणत्याही जेतेपदानंतर हुरळून न जाता, कामगिरीत सुधारणा आणि सातत्य राखणं आवश्यक आहे हे ती नम्रपणे सांगते. दमदार भरारी घेण्याची मानसिकता या नम्रपणातच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा