सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या तीन अव्वल शिलेदारांनी विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत खळबळजनक विजयांची नोंद करून सर्वाच्या आशा उंचावल्या होत्या. पण सायना आणि कश्यप या अव्वल खेळाडूंना पदकाने पुन्हा हुलकावणी दिली. मात्र युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी करत विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला एकेरी बॅडमिंटनपटू ठरणार आहे. सिंधूच्या यशामुळे भारतासाठी हा दिवस ‘कही खुशी’, तर सायना, कश्यपच्या निराशाजनक कामगिरीमुळे ‘कही गम’ असा ठरला आहे.
पहिल्याच विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाऱ्य १८ वर्षीय सिंधूने चीनची बलाढय़ खेळाडू शिझियान वांग हिच्यावर सरळ गेममध्ये मात करून उपांत्य फेरी गाठली आहे. १०व्या मानांकित सिंधूने ५५ मिनिटांच्या झुंजीनंतर सातव्या मानांकित शिझियानला २१-१८, २१-१७ अशी पराभवाची धूळ चारत पदक आपल्या नावावर केले. याआधीही सिंधूने वांगला पराभूत केले होते. तिला उपांत्य फेरीत थायलंडच्या रात्चानोक इन्थानोन हिच्याशी लढत द्यावी लागणार आहे. यापूर्वी १९८३मध्ये भारताच्या प्रकाश पदुकोण यांनी कोपनहेगन येथील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तसेच महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी २०११मध्ये लंडन येथे कांस्यपदकाची कमाई केली होती.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी आणि गेल्या दोन वेळेला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारी सायना आपल्या निराशाजनक कामगिरीची परंपरा खंडित करू शकली नाही. सायनाला कोरियाच्या येऊन जू बे हिच्याकडून २१-२३, ९-२१ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कश्यपने पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजयासाठी घाम गाळला. पण जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या डू पेंगयू याच्यासमोर कश्यपला २१-१६, २०-२२, १५-२१ अशी शरणागती पत्करावी लागली.
वांगविरुद्धच्या सामन्यात सिंधूने दमदार स्मॅशेसवर अधिक भर दिला. १९ वेळा स्मॅशेसचे अचूक फटके लगावत तिने गुण वसूल केले. सिंधूने ६-३ अशी आघाडी घेत सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. ही आघाडी कायम ठेवत तिने १३-८ अशी आगेकूच केली. वांगने सलग चार गुण मिळवत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूने खेळात सुधारणा करत तीन गुण मिळवून आघाडी कायम राखली. १८-१९ अशा स्थितीतून तिने तीन गुण पटकावत पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने खेळात सातत्य राखून ६-२ अशी सुरुवात केली. ६-६ अशा बरोबरीनंतर सिंधूने २०-१६ अशी आघाडी घेतली. पण एक गुण गमावल्यानंतर सिंधून दुसरा गेम जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेत खळबळजनक विजयांची नोंद करणाऱ्या सिंधूने याआधीच्या सामन्यात गतविजेत्या यिहान वांगला पराभवाचा धक्का दिला होता.  सायनाने आक्रमक खेळ करत ११-७ अशी आघाडी घेतली. पण फटक्यांमधील अचूकतेचा अभाव आणि मैदानावरील धीम्या हालचालींमुळे येऊन बे हिने १९-१९ अशी बरोबरी साधली. नेटवर केलेल्या खराब खेळामुळे सायनाला पहिला गेम गमवावा लागला. त्यानंतर सायनाचा आत्मविश्वास खालावला. बेच्या फटक्यांना प्रतिकार करताना सायनाची दमछाक होत होती. बे हिने स्मॅशेस आणि ड्रॉप-शॉट्स लगावत गुण वसूल केले. पण तिचा पाठलाग करणे सायनाला जमले नाही.
कश्यपने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डू याने ७-० अशी भलीमोठी आघाडी घेतली. पण कश्यपने संयमी खेळ करत १६-१६ अशी बरोबरी साधली. त्याने २०-१९ असा गेमपॉइंट मिळवला होता. पण डू याने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक गेममध्येही कश्यप ९-४ अशा आघाडीवर होता. पण कश्यपला आघाडी कायम राखता न आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा