ओडेन्स : लक्ष्य सेनसह भारताच्या सर्व खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात येत असतानाच पी. व्ही. सिंधू डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची (सुपर ७५० दर्जा) दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.चायनीज तैपेईच्या पै यू पो हिने सिंधू विरुद्ध दुसऱ्या गेमला दुखापतीमुळे माघार घेतली. यामुळे सिंधूला विजयी घोषित करण्यात आले. अर्थात, पो हिच्या माघारीच्या निर्णयावेळी सिंधूचेच पारडे जड होते. सिंधूने पहिला गेम २१-८ असा जिंकला होता, तर दुसऱ्या गेममध्ये ती १३-७ अशी आघाडीवर होती.
पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा पराभव भारतासाठी धक्कादायक होता. लक्ष्यला पहिला गेम जिंकल्याचा फायदा उठवता आला नाही. तासाभराहून अधिक वेळ झालेल्या लढतीत लक्ष्यला चीनच्या लू गुआंगकडून २१-१२, १९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. व्हिएतनामच्या एन्गुयेन थुय लिन्हने चीन खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या मालविका बनसोडचा २१-१३, २१-१२ असा पराभव केला.