चीनमध्ये नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत सिंधून आपल्या कारकीर्दीत प्रथमच अव्वल दहाजणांमध्ये स्थान मिळवले आहे.
महिला एकेरीच्या क्रमवारीत सिंधूने दोन स्थानांनी आगेकूच करून ५५१७२ गुणांसह १०वे स्थान काबीज केले आहे. सध्या हैदराबादची सिंधू आयबीएल स्पध्रेत खेळत आहे. तथापि, लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सायना नेहवालने मात्र आपले चौथे स्थान टिकवून ठेवले आहे.
पुरुषांच्या एकेरीमध्ये पारुपल्ली कश्यपने तीन स्थानांनी आगेकूच करीत १४वे स्थान मिळवले आहे, तर आरएमव्ही गुरुसाईदत्त २०व्या स्थानावर आहे. मुंबईच्या अजय जयरामनेही आपले २४वे स्थान कायम राखले आहे.

Story img Loader