PV Sindhu on Vinod Kambli: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं लग्नानंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिनं माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या व्हायरल व्हिडीओचा उल्लेख केला. डिसेंबर महिन्यात शिवाजी पार्क येथे रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी विनोद कांबळीला जागेवरून उठताही आले नव्हते. यानंतर काही दिवसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारासाठी कांबळीकडे पुरेसे पैसे नसल्याचंही कारण समोर आलं होतं. या सर्व घटनेवर आता पीव्ही सिंधूंनं महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना पीव्ही सिंधू म्हणाली की, विनोद कांबळी यांचा व्हायरल व्हिडीओ पाहून दुःख वाटलं. मी काहीशी भावनिकही झाली. चांगली लोकं आपल्या आयुष्यात आजूबाजूला असणं किती महत्त्वाचं आहे, हे हा व्हिडीओ पाहून कळतं. आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण आपण काळजीपूर्वक त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणारे लोक तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे.
याबरोबरच गुंतवणुकीचं महत्त्वही पीव्ही सिंधूंनं या मुलाखतीमध्ये सांगितलं. “विनोद कांबळी यांचा व्हिडीओ पाहून मला समजलं की, नियोजन किती महत्त्वाचं आहे. तुमच्या भविष्याची सोय होईल, यापद्धतीनं पैसे योग्य प्रकारे गुंतवायला हवेत. त्यामुळंच पैशांची उधळपट्टी न करता अगदी विचारपूर्वक ते गुंतवले पाहीजेत”, असंही पीव्ही सिंधू म्हणाली.
गुंतवणुकीबाबत पीव्ही सिंधू पुढं म्हणाली, “जेव्हा तुम्ही आघाडीचे खेळाडू असता, तेव्हा तुम्हाला पैसे मिळत राहतात. ते योग्य प्रकारे गुंतवायला हवेत. तसेच करही वरचेवर भरले पाहीजेत, तेही महत्त्वाचं आहे. जर कर भरला नाही, तर मग अडचण निर्माण होईल. माझे आई-वडील आणि माझा पती गुंतवणूक आणि कर भरण्याची जबाबदारी उचलतात. आजवर मला तरी आर्थिक समस्या उद्भवलेली नाही. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.”