पीटीआय, दुबई
दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि अनुभवी एचएस प्रणॉय यांना आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.आठव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या दुसऱ्या मानांकित आन से यंगकडून २१-१८, ५-२१, ९-२१ अशी हार पत्करली. या लढतीतील संघर्षपूर्ण झालेला पहिला गेम जिंकत सिंधूने आघाडी घेतली. मात्र, उर्वरित दोन गेममध्ये यंगच्या आक्रमक खेळापुढे सिंधूचा निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये यंगने आपल्या फटक्यांनी सिंधूला स्थिरावू दिले नाही व गेम २१-५ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्येही आपली हीच लय कायम राखत तिने गेमसह सामनाही जिंकला.
यानंतर सर्वाच्या नजरा प्रणॉयच्या सामन्याकडे होत्या. मात्र, त्यानेही निराशा केली. जपानच्या कांता त्सुनेयामाविरुद्धच्या सामन्यात पहिला गेम प्रणॉयने ११-२१ असा गमावला. दुसऱ्या गेममध्येही १३-९ असा पिछाडीवर असताना दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी, पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या रोहन कपूर व एन. सिक्की रेड्डी जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात इंडोनेशियाच्या देजान फेरदिनानस्याह व ग्लोरिया एमान्युएल जोडीकडून १८-२१, २१-१९, १५-२१ असा पराभव पत्करला.