लखनऊ : तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ईरा शर्माला तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात नमवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तर लक्ष्य सेननेही आपली लय कायम राखत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.

दोन ऑलिम्पिक पदकविजेती व जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने दुसऱ्या फेरीतील सामन्यात ईरावर २१-१०, १२-२१, २१-१५ असा विजय मिळवला. सिंधू गेल्या काही काळापासून लयीत नाही आणि तिने २०२२ मध्ये सिंगापूर खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. सिंधूचा सामना पुढच्या फेरीत चीनच्या डाइ वँगशी होणार आहे. वँगने दुसऱ्या फेरीत भारताच्या देविका सिहागला १९-२१, २१-१८, २१-११ असे नमवले. महिला एकेरीच्या अन्य सामन्यात बिगरमानांकित उन्नती हुडाने दुसऱ्या फेरीत उलटफेर करताना थायलंडच्या पोर्नपिचा चोइकीवोंगला २१-१८, २२-२० असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तर दुसऱ्या मानांकित मालविका बनसोडला श्रीयांशी वलिशेट्टीकडून १२-२१, १५-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. तर तस्नीम मीरने अनुपमा उपाध्यायला २१-१५, १३-२१, २१-७ अशा फरकाने नमवले.

हेही वाचा >>>IND vs AUS: काय? विराट कोहलीच्या बॅगमध्ये कुऱ्हाड, तलवारी अन् ढाल, VIDEO होतोय व्हायरल

पुरुष एकेरीत अग्रमानांकित लक्ष्य सेनने इस्रायलच्या दानिल डुबोवेंकोवर ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१४, २१-१३ असा विजय नोंदवला. उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्यसमोर मेइराबा लुवांगचे आव्हान असेल. लुवांगने आयर्लंडच्या सहाव्या मानांकित एनहाट एनगुएनला २१-१५, २१-१३ असे नमवले होते. आयुष शेट्टीने मलेशियाच्या होह जस्टिनला २१-१२, २१-१९ असे पराभूत केले. भारताच्या दुसऱ्या मानांकित प्रियांशू राजावतने व्हिएतनामच्या ली डुक फाटला २१-१५, २१-८ असे हरवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.