रोमहर्षक लढतीत बेनवेई विजेती
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूला विजेतेपदाच्या उंबरठय़ावरून अनेक वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. याचा प्रत्यय येथील इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पाहायला मिळाला. उत्कंठापूर्ण अंतिम सामन्यात अमेरिकन खेळाडू झांग बेनवेईने तिचा २१-१८, ११-२१, २२-२० असा पराभव केला. पुरुष गटात चीनच्या शेई युकी याला विजेतेपद मिळाले. पुरुषांच्या अंतिम लढतीत युकीने तृतीय मानांकित चोयू तिएनचेन याचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला.
घरच्या मैदानावरील या स्पर्धेत भारताला सिंधूकडून अजिंक्यपदाच्या आशा होत्या. मात्र आजपर्यंत अनेक वेळा सिंधूला विजेतेपदाच्या लढतीत पराभूत व्हावे लागले आहे. येथेही पहिला गेम गमावल्यानंतर तिने दुसरी गेम घेतली. तिसऱ्या गेममध्ये २०-१९ अशी आघाडी असताना तिला विजेतेपदासाठी आवश्यक असलेला एक गुण मिळवता आला नाही. सिंधू व बेनवेई यांच्यातील लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. घरच्या प्रेक्षकांना सिंधूकडून सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा होती. अग्रमानांकित सिंधूने पहिल्या गेममध्ये ९-९ अशा बरोबरीनंतर १२-१० अशी आघाडीही घेतली होती. १५-१५ अशा बरोबरीनंतर बेनवेईने खेळावर नियंत्रण मिळवले. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत १९-१६ अशी आघाडी मिळवली. सिंधूने दोन गुण मिळवले. तथापि बेनवेईने सलग तीन गुण घेत ही गेम जिंकली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूला सूर गवसला. तिने ९-४ अशी आघाडी घेताना ड्रॉपशॉट्स व कॉर्नरजवळ सुरेख फटके असा खेळ केला. ही गेम तिने एकतर्फी जिंकून तिसऱ्या गेमबाबत उत्कंठा वाढविली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरकस फटक्यांचा उपयोग केला. तसेच त्यांनी प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. या गेममध्ये सतत सामन्याचे पारडे बदलत होते. ५-९ अशा पिछाडीवरून सिंधूने ११-११ अशी बरोबरी साधली. १५-१५ अशा बरोबरीनंतर बेनवेईने १९-१७ अशी आघाडी मिळवली. जिगरबाज खेळाडू सिंधूने लागोपाठ तीन गुण घेत २०-१९ अशी आघाडी घेतली. ही गेम घेत सिंधू अजिंक्यपदावर मोहोर नोंदवणार असे वाटले होते. तथापि बेनवेईने पुन्हा सलग तीन गुण घेताना सामन्याला कलाटणी देत विजेतेपद पटकाविले. तिने परतीचे सुरेख फटके मारले व प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. हा सामना बेनवेईने एक तास नऊ मिनिटांत जिंकला. सिंधू पराभूत झाल्यामुळे येथे उपस्थित असलेल्या चाहत्यांची निराशा झाली.