खराब कोर्टमुळे सायनाचा खेळण्यास नकार; साईप्रणीत, कश्यप यांचे सामनेही रद्द
रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूने गुरुवारी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवालने निकृष्ट दर्जाच्या कोर्टमुळे सामना खेळण्यास नकार दर्शवल्याने आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सिंधूने महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नागपूरच्या मालविका बनसोड हिच्यावर २१-११, २१-१३ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. सिंधूने फोरहँड व क्रॉसकोर्टच्या फटक्यांचा सुरेख वापर करतानाच स्वत:ला अधिक थकवा जाणवणार नाही, याचीही काळजी घेतली. त्यानंतर सायना व श्रुती मुंदडा यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच सायनाने कोर्टची पाहणी करण्याचा निर्णय घेतला व कोर्टवरील लाकडी आवरण उंच-सखल असल्यामुळे अखेर सायनाने दुखापतीचा धोका उद्भवू शकतो, या कारणास्तव खेळण्यास नकार दिला. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी कोणताही धोका पत्करण्यास भारतीय खेळाडू तयार नसल्याचे यामधून सिद्ध झाले.
आसाम बॅडमिंटन अकादमीच्या तीन कोर्टवर या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येत असून सायनाला गतवर्षी पायाच्या दुखापतीने ग्रासले होते, त्यामुळे तिने त्वरित खेळण्यास नकार दिला. दरम्यान, भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) या प्रकरणाची दखल घेतली असून रद्द झालेले सामने बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील, असेही जाहीर केले. सिंधूव्यतिरिक्त अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या मानांकित अस्मेसी अश्मिता व श्रियांशी परदेशी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीत अव्वल मानांकित समीर वर्माने पायाच्या दुखापतीमुळे आर्यमन टंडनविरुद्ध २१-१६, १-८ अशी आघाडी असताना माघार घेतली. मात्र सायनाने तक्रार नोंदवल्यानंतर बी साईप्रणीत व पारुपल्ली कश्यप यांचे सामनेही पुढे ढकलण्यात आले. याव्यतिरिक्त माजी विजेत्या सौरभ वर्मा, लक्ष्य सेन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. सौरभने कार्तिक जिंदालवर २१-८, २१-१५ असा विजय मिळवला, तर लक्ष्यने अन्साल यादवला २१-११, २१-८ अशी सहज धूळ चारली.
पुरुष दुहेरीत प्रथम मानांकित अर्जुन एमआर आणि श्लोक रामचंद्रन यांच्या जोडीने रोहन कपूर व सौरभ वर्मा यांना २१-११, २१-१८ असे पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली, तर प्रणव चोप्रा व चिराग शेट्टी यांनीसुद्धा उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करताना रुपेश कुमारआणि व्ही दिजू यांना २१-८, १८-२१, २२-२० असे रोमहर्षक लढतीत नमवले.
सिंधूच्या सामन्यानंतर कोर्टवरील काही ठिकाणचे लाकडाचे तुकडे बाहेर आले असून ते पुन्हा चिकटवण्यासाठी आयोजकांना वेळ लागणार आहे. ऑल इंग्लंडसारखी महत्त्वाची स्पर्धा तोंडावर असल्यामुळे कोणताही खेळाडू त्यांच्या तंदुरुस्तीशी तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे माझ्यासह सायना व साईप्रणीतचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. – पारुपल्ली कश्यप, भारतीय बॅडमिंटनपटू