नवी दिल्ली : गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवल्यानंतर यंदा एक पाऊल पुढे जात सोनेरी यश मिळवण्याचे ध्येय भारताची आघाडीपटू बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बाळगले आहे. २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा सिंधूला विश्वास आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्रा (नेमबाजी, २००८) आणि नीरज चोप्रा (भालाफेक, २०२२) यांनाच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांतील यशानंतर सिंधूला आता ऑलिम्पिकमधील भारताची पहिली महिला सुवर्णपदक विजेती म्हणून इतिहास घडवण्याची संधी आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपण उत्सुक असून त्या दृष्टीनेच तयारी करत असल्याचे सिंधूने सांगितले.

हेही वाचा >>>सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

‘‘पॅरिसमध्ये ऑलिम्पिक कारकीर्दीतील तिसरे पदक मिळवण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदा सुवर्णपदकाचेच माझे ध्येय आहे. अन्य स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये खूप फरक आहे. ऑलिम्पिकला वेगळेच महत्त्व आहे आणि या स्पर्धेत मी नेहमीच माझे २०० टक्के देऊन खेळते,’’ असे सिंधू म्हणाली.

‘‘२०१६ आणि २०२० च्या स्पर्धेतील प्रवास अविस्मरणीय होता. या दोन्ही स्पर्धांत पदकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. आता पॅरिस येथे होणारी स्पर्धाही याला अपवाद ठरणार नाही. मी नव्या जोमाने या स्पर्धेत उतरेन आणि काहीही झाले तरी १०० टक्के देऊनच खेळेन,’’ असा विश्वास सिंधूने व्यक्त केला.

‘‘याआधीच्या ऑलिम्पिकमधील अनुभवांनी खेळाडू म्हणून मला समृद्ध केले आहे. या अनुभवांचा मला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे फायदा होईल. पदकाबाबत मला अतिआत्मविश्वास बाळगायचा नाही. मी पूर्ण तयारीनिशीच या स्पर्धेत उतरेन. देशाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणे सोपे नाही. मात्र, मी केवळ सुवर्णपदकावर लक्ष केंद्रित केले आहे. सोनेरी यशाचा विचारही मला खूप प्रेरणा आणि आत्मविश्वास देतो,’’ असे सिंधूने नमूद केले.