All England Badminton Championship 2023: ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय स्टार पीव्ही सिंधूचा खराब फॉर्म कायम राहिला आहे. ती बुधवारी चीनच्या झांग यी मॅनकडून सरळ गेममध्ये पराभूत झाल्यानंतर पहिल्या फेरीत बाहेर पडली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूला महिला एकेरीच्या ३९ मिनिटे चाललेल्या लढतीत १७-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला.
सिंधूने पहिल्या फेरीच्या पुढे प्रगती न करण्याची यंदाची तिसरी वेळ आहे. जानेवारीमध्ये मलेशिया ओपनमध्ये तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याच महिन्यात इंडियन ओपनमध्ये पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती.
या भारतीयाने अलीकडेच तिचे कोरियन प्रशिक्षक पार्क ताई-सांग यांच्याशी फारकत घेतली होती, ज्यांच्या हाताखाली तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. संपूर्ण सामन्यात सिंधू तिच्या रंगात दिसली नाही. जागतिक क्रमवारीत १७व्या क्रमांकावर असलेल्या झांग यीने तिच्यापेक्षा जास्त चपळता आणि आक्रमकता दाखवली. या सामन्यापूर्वी या दोन्ही खेळाडूंचा विक्रम १-१ असा बरोबरीत होता.
सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली आणि नंतर ती १६-१३ अशी केली. परंतु चीनच्या खेळाडूने सलग सात गुण मिळवून २०-१६ अशी आघाडी घेतली. तिने २१ मिनिटांत पहिला गेम जिंकला. दुस-या गेममध्ये दोन्ही खेळाडू सुरुवातीला ५-५अशा बरोबरीत होत्या. पण सिंधूने काही चुका केल्या, ज्यामुळे ती लवकरच ५-१० अशी खाली गेली. यानंतर भारतीय खेळाडूला पुनरागमन करता आले नाही आणि दुसरा गेम आणि सामना गमावला.
हेही वाचा – Rohit Sharma: डीजे मार्टिन गॅरिक्सला रोहितने दिली जर्सी भेट; भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
तत्पूर्वी, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने ४६ मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. या लढतीत त्यांनी थायलंडच्या सातव्या मानांकित जोंगकोलफान कितिथारकुल आणि रविंदा प्रजोंगजाई यांचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला. प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारतीय जोडीचा मुकाबला जपानच्या युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा या जोडीशी होईल. मंगळवारी, लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी आपापले सामने जिंकले होते.