भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी शानदार विजयांसह डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन प्रीमियर स्पध्रेचा पहिला अडथळा ओलांडण्यात यश मिळवले आहे. याचप्रमाणे पुरुषांच्या एकेरीत परुपल्ली कश्यपने इंग्लंडच्या राजीव ऑसेफचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे.
सायनाला पहिल्या फेरीचे आव्हान पेलण्यासाठी जर्मनीच्या करिन श्नासीविरुद्ध ४९ मिनिटे झुंजावे लागले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सायनाने पहिला गेम गमावला, परंतु स्मॅशच्या ताकदवान फटक्यांच्या बळावर सायनाने दुसरा आणि तिसरा गेम जिंकत १२-२१, २१-१०, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवला. तसेच सिंधूने ३९ मिनिटांत हाँगकाँगच्या पूय यिन यिपचा २१-१३, २२-२० असा सहज पराभव केला. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने चीनच्या शू साँगवर २१-१५, १७-२१, २१-१८ अशी मात केली.
याचप्रमाणे मिश्र दुहेरीत रशियाच्या व्लादिमिर इव्हानोव्हच्या साथीने खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पाचे आव्हान संपुष्टात आले. हाँगकाँगच्या युन लंग चान आणि यिंग सुएत त्से यांनी २१-१८, २१-१८ अशा फरकाने त्यांच्यावर विजय मिळवला.
ज्वाला गट्टा आणि अश्विनी यांना महिला दुहेरीत पराभव पत्करावा लागला आहे. नेदरलँड्सच्या ईफ्जे मुस्कीन्स आणि सेलेना पाइक यांनी २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा