जागतिक क्रमवारीत द्वितीय मानांकित सिझियान वांगला हरवून विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक निश्चित करत इतिहास घडवणाऱ्या पी. व्ही. सिंधूचा झंझावात थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनने रोखला. या स्पर्धेत भारताचे उर्वरित एकमेव आव्हान शनिवारी संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या इन्थॅनॉनने सिंधूवर २१-१०, २१-१३ अशी सरळ गेम्समध्ये मात केली. या पराभवामुळे सिंधूला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने वांग यिहान आणि सिझियान वांग या मातब्बर चिनी खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरीत धडक मारली होती. आपल्या पहिल्यावहिल्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतच सिंधूने घेतलेल्या भरारीमुळे सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या अनपेक्षित पराभवाचे शल्य कमी झाले.
चीनच्या खेळाडूंच्या साथीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पावधीतच नाव कमावलेल्या रत्नाचोक इन्थॅनॉनने आपल्या फटक्यांमध्ये चतुराईने बदल करत आणि कोर्टवरच्या सुरेख वावरासह अंतिम फेरीत धडक मारली. हातून झालेल्या चुकांचा सिंधूला फटका बसला.
प्रतिस्पध्र्याला चकवणाऱ्या फटक्यांच्या आधारे रत्नाचोकने सिंधूला नामोहरम केले. चीनच्या आक्रमक खेळाला सरावलेली सिंधू थायलंडच्या रॅचानोकच्या शैलीदार, चतुराईपूर्ण सर्वागीण खेळासमोर निष्प्रभ ठरली.
पहिल्या गेममध्ये सिंधूच्या चुकांच्या जोरावर रत्नाचोकने ११-४ अशी दमदार आघाडी घेतली. यानंतरही सिंधूकडून वारंवार चुका घडत राहिल्या. तिचे फटके अवैध ठरत होते. रॅचानोकने याचा पुरेपूर फायदा उठवत १९-१० अशी विजयी आगेकूच केली. स्मॅशच्या प्रभावी फटक्यांच्या साह्य़ाने पहिला गेम रॅचानोकने नावावर केला.
दुसऱ्या गेममध्येही सिंधूच्या खेळात सुधारणा झाली नाही. तिचे अनेक फटके नेटवर जाऊन आदळले. याचा फायदा उठवत रत्नाचोकने ८-१ अशी मजबूत आघाडी मिळवली. नेटजवळून चांगला खेळ करत सिंधूने पिछाडी भरून काढत ५-१० अशी गुणसंख्या केली. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी सिंधूला हा गेम जिंकणे अत्यावश्यक होते. ११-५ अशी आघाडी असताना रत्नाचोकने अचूकतेसह अफलातून फटक्यांची पोतडी उघडली. १९-१२ अशी भक्कम आघाडी रत्नाचोंकने मिळवली. मॅचपॉइंट वाचवत सिंधूने परतण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला. दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा करत रत्नाचोकने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. १८ वर्षीय रत्नाचोक विश्व अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडला पदक मिळवून देणारी पहिली बॅडमिंटनपटू ठरली.
कांस्यपदकाने आनंदी! – पी.व्ही.सिंधू
‘‘आजच्या पराभवाने मी निराश झाले, मात्र कांस्यपदकावर नाव कोरता आल्याने आनंद झाला आहे. ही माझी पहिलीच विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा असल्यामुळे हा माझ्यासाठी मोठा विजय आहे. माझ्यासाठी प्रत्येक फेरी आव्हानात्मक होती. सर्व सामने अव्वल खेळाडूंविरुद्ध होते आणि प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ गरजेचा होते. वांग यिहान आणि सिझियान वांगचा मला मुकाबला करावा लागणार होता. पण मी हरेन असे मला कधीच वाटले नव्हते. दुखापतीतून सावरत मी पुनरागमन करत होते. दोन स्पर्धामध्ये मला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत मला सर्वोत्तम प्रयत्न द्यायचे होते. रत्नाचोकविरुद्धचा सामना कठीण होता. तिने खूपच चांगला खेळ केला. मी खूप चुका केल्या. आणखी चांगल्या खेळासह मी पुनरागमन करेन. कच्च्या दुव्यांवर मी काम करणार आहे. आगामी इंडियन बॅडमिंटन लीग आणि अन्य स्पर्धामध्ये मी या स्पर्धेत झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. गोपीचंद सरांच्या मार्गदर्शनानुसार मी खेळ केला. स्पर्धेपूर्वी आम्ही काही योजना आखल्या होत्या. त्यानुसार खेळ करता आल्याने आनंदी आहे. माझ्यावर दडपण असे कोणतेच नाही. अपेक्षांपलीकडे जाऊन खेळ करायचा आहे!’’
‘‘सिंधूची सायना किंवा प्रकाश पदुकोण यांच्यासमवेत तुलना करणे योग्य नाही. रॅचानोकने सिंधूला आक्रमणापासून रोखले. अशा स्वरुपाचा खेळ १९८०मध्ये प्रकाश पदुकोण करत असे. रत्नाचोकने सिंधूला फटका नेटजवळ असेल का कोर्टच्या मागच्या बाजूस या संभ्रमात ठेवले. सिंधूने पल्लेदार रॅलींचा आधार घेऊन आक्रमण करायला हवे होते. पण सिंधू अजून लहान आहे, या स्वरुपाच्या खेळाचा प्रतिकार करण्याची सवय तिने लावून घ्यायला हवी. मात्र आताच सिंधूची तुलना सायनाशी करणे योग्य नाही. सायना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच वर्षे सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. सिंधू गुणवान खेळाडू आहे, मात्र तिने खेळात सातत्य आणि वैविध्य आणायला हवे.
– विमल कुमार, प्रशिक्षक
‘‘पी. व्ही. सिंधूने डावपेच आखण्यात चुका केल्या. मात्र येत्या वर्षांत ती या चुकांतून शिकेल. तिच्या हातून मोठय़ा प्रमाणावर चुका झाल्या. काही टप्प्यांत ती चांगले खेळली. ती लहान आहे, जगातील मातब्बर खेळाडूंना तिने नमवले आहे. भविष्यात ती आणखी चांगली खेळाडू म्हणून समोर येईल. वेगवान खेळ करणाऱ्या खेळाडूंविरुद्ध तिला खेळायला आवडते. मात्र शटलवर ताबा ठेवत, चतुराईने चकवणारे फटके खेळणाऱ्या खेळाडूसमोर खेळणे हा सिंधूच्या खेळाचा कच्चा दुवा आहे. पण ती लवकरच हा दोष दूर करेल. सिंधूच्या या कामगिरीमुळे महिला बॅडमिंटनला एक नवी उंची मिळाली आहे. सिंधूची कामगिरी अनेक युवा बॅडमिंटनपटूंसाठी प्रेरणादायी ठरेल.’’
-उदय पवार, प्रशिक्षक