धनंजय रिसोडकर

मनात सुरू असलेली खळबळ चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस.. कोणत्याही परिस्थितीत शांत राहा.. नैसर्गिक खेळ कर.. हाच मंत्र होता ताय झू यिंगला हरवण्याचा. सायना नेहवालला सलग १० वेळा आणि सिंधूला सलग ६ वेळा पराभूत करणाऱ्या तायला हरवण्याचा मार्गच दोघींना सापडत नव्हता. ताय नावाचे कोडे दीड वर्षांपासून उलगडत नव्हते. सायनाने तर तायपुढे हातच टेकले होते. पण सिंधूने जिद्द सोडली नव्हती. अखेर वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत सिंधूला ती संधी मिळाली आणि सातव्या सामन्यात सिंधूने ताय नावाची भिंत सर केली. तायचा पराभव आणि संपूर्ण वर्षभरात विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर वर्षअखेरीस मिळालेले वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद हे सिंधूच्या दृष्टीने अनमोल आहे.

वर्षभर विजेतेपदाच्या अगदी जवळ जाऊनही अपयशच पदरात पडणे म्हणजे काय, याची अनुभूती सिंधूने २०१८ मध्ये घेतली होती. अगदी हातातोंडाशी आलेले विजेतेपद हिरावले जात होते. एक-दोन वेळा नाही, तर तब्बल ७ वेळा. गतवर्षी जागतिक सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागण्याचे दु:ख सिंधूला होते. प्रसारमाध्यमे आणि तिच्या चाहत्यांनाही एकच प्रश्न पडला होता, तो म्हणजे सिंधूचा विजेतेपदाचा दुष्काळ. मोठय़ा खेळाडूंना त्यांच्या अपयशाचे इतके दु:ख नसते. कारण खेळात यशअपयश असतेच, कारकीर्दीत चढउतार असतात, हेदेखील ते पूर्णपणे जाणून असतात. त्यामुळे त्या अपयशापेक्षा होणाऱ्या टीकेमुळे त्यांना अधिक वेदना होतात. तसेच काहीसे सिंधूच्या बाबतीत झाले होते. आपण कुठेच चुकत नाहीये, ही खात्री होती तिला आणि प्रशिक्षक गोपी सरांना. पण तरीही यश गवसत नव्हते.

तब्बल ७ सुपर सिरीजच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणे, ही कोणत्याही खेळाडूसाठी मोठी कामगिरी असते. पण आपल्या देशात तुम्ही खेळातले महानायक झालात की जिंकलेच पाहिजे, हा अलिखित नियम आहे. तरच तुमचं नायकत्व कायम राहते. अन्यथा कुणीही टपल्या मारायला टपलेलाच असतो. त्यामुळेच ओकुहाराला हरवून जेव्हा सिंधूने जमिनीवर हात टेकवले, त्या वेळी तिच्या डोळ्यातून चार थेंब चटकन मॅटवर ओघळले. कारण महानायकत्व मिळवणे आणि ते कायम राखणे यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, ते आपल्याला माहितीच नसते. आपण केवळ कोर्टवर खेळणारी आणि पदके व चषक उंचावणरी सिंधूच बघत असतो. पण त्यासाठी दररोज दहा-दहा तास कोर्टवर घाम गाळणारी सिंधू आपल्याला ज्ञातच नसते. तेदेखील वयाच्या आठव्या वर्षांपासून तब्बल दीड दशकाहून अधिक काळ. त्यामुळेच वर्षअखेरीस का होईना, एक विजेतेपद मिळाल्यानंतर अखेरीस चाहत्यांच्या दृष्टीने त्या श्रमाचे चीज झाल्याचे ते अश्रू असतात. आणि श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध केल्याने मला आता कुणाच्या बोचऱ्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार नसल्याचे आनंदाश्रू असतात.

पराभवातूनच शिकायला मिळतं..

खेळाडू म्हणून नेहमीच तुम्ही स्वत:चे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करता. त्यात कधी यश मिळतं, कधी मिळत नाही. वर्षभरात मला सात वेळा अंतिम सामन्यात अपयश आलं. पण तो पराभव म्हणजे सारं काही संपलं, असं मी कधीच मानत नाही आणि मानले नाही. त्यामुळे त्या स्पर्धातील अपयशही मी सकारात्मकपणे घेतले. कारण पराभवातूनच अधिक शिकायला मिळत असतं. त्या सामन्यात आपले नक्की काय कमी पडले? त्याचा विचार करून त्या दृष्टीने अजून खेळावर मेहनत घेतली. कोणत्याही खेळाडूवर मात करता येऊ शकते, यावर माझा विश्वास होता. अन् त्याच विचाराने मी ताय आणि यामागुचीविरुद्ध खेळले आणि जिंकले.

– पी. व्ही. सिंधू, वर्ल्ड टूर फायनल्स विजेती बॅडमिंटनपटू

सिंधूची वर्षभरातील कामगिरी

यंदाच्या वर्षभरात सिंधूने इंडोनेशिया, चीन, फ्रेंच आणि आशिया स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर मलेशिया आणि ऑल इंग्लंडची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले होते. तर आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धा, थायलंड खुली स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचून उपविजेतेपद पटकावले होते. तर वर्षअखेरीस वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले.

Story img Loader