अफाट गुणवत्ता असलेल्या पी. व्ही. सिंधूच्या सुरेख कामगिरीमुळे फक्त सायना नेहवालवरील अपेक्षांचे ओझे हलके झालेले नाही तर महिलांच्या एकेरी प्रकारात भारताचा दबदबा वाढू लागला आहे, असे मत माजी ऑलिम्पिक विजेता आणि विश्वविजेता बॅडमिंटनपटू तौफिक हिदायतने व्यक्त केले.
‘‘महिला एकेरीत आता सायनाला सिंधूचा पाठिंबा मिळू शकेल. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सिंधूची उपांत्यपूर्व फेरीची लढत मी पाहिली. तिच्यात अफाट गुणवत्ता आहे. सिंधूने घेतलेली झेप कौतुकास्पद असून महिला एकेरीत सायनापाठोपाठ आता सिंधू असल्यामुळे भारताची कामगिरी नक्कीच उंचावेल. भारतीय बॅडमिंटनसाठी ही चांगली बाब म्हणावी लागेल,’’ असेही हिदायतने सांगितले.
जागतिक बॅडमिंटनमधील परिस्थिती आता हळूहळू बदलू लागली आहे. चीन फार जास्त काळ बॅडमिंटनमध्ये महासत्ता राहू शकत नाही, याची झलक पाहायला मिळत आहे, असेही हिदायतला वाटते. ‘‘महिला एकेरीत अनेक देशाच्या खेळाडू पुढे येत आहेत. पण महिला दुहेरीत चीनचा दबदबा अद्यापही कायम आहे. लिन डॅन वर्षभर कोर्टपासून दूर असल्यामुळे पुरुष एकेरीचे जेतेपद त्याने पटकावल्याचे आश्चर्य मला वाटले. त्याच्यात अद्यापही जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, हे त्याने दाखवून दिले. लिन डॅन आणि ली चोंग वुई निवृत्त झाल्यानंतर पुरुष एकेरीत थरारक खेळ पाहायला मिळणार नाही, असे वाटते. ते दोघेही महान खेळाडू आहेत,’’ असे इंडोनेशियाचा निवृत्त बॅडमिंटनपटू हिदायत म्हणाला.
‘‘आयबीएलसाठी परदेशी खेळाडू भारतात आल्यामुळे त्याचा फायदा युवा बॅडमिंटनपटूंना होणार आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्यामुळे माझ्याकडून फारशा अपेक्षा बाळगणे योग्य नाही. पण माझ्या अनुभवाचा फायदा मी युवा बॅडमिंटनपटूंना करून देणार आहे,’’ असेही त्याने सांगितले.

Story img Loader