सलामीवीर ईडी कोवान, मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा आणि आयपीएलच्या लिलावात एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करणारा ग्लेन मॅक्सवेल हे सारे नव्या दमाचे फलंदाज भारतीय भूमीवरील रंगीत तालिमसाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाचा संघ अध्यक्षीय संघाविरुद्ध पहिला दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि उपकर्णधार शेन वॉटसन यांच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू व्ॉडकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. क्लार्क आणि वॉटसनसहित अजून बरेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात दाखल झालेले नाहीत. सध्या फक्त ११ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थानिक क्रिकेट संघटनेच्या खेळाडूंची बदली क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना मदत घेता येईल.
‘‘आमचे दिग्गज ख्ेाळाडू भारतात यायचे आहेत. त्यामुळे उपलब्ध ११ खेळाडूंवरच आमची मदार आहे,’’ असे व्ॉड यावेळी म्हणाला. या दोन दिवसांच्या लढतीला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा मिळणे अवघड आहे. अध्यक्षीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. सलामीवीर अभिनव मुकुंद, फॉर्मात असलेला फलंदाज अंबाती रायुडू, पंजाबचा गुणी फलंदाज मनदीप सिंग, अष्टपैलू परवेझ रसूल, नवा वेगवान गोलंदाज शामी अहमद यांचा अध्यक्षीय संघात समावेश आहे. भारत ‘अ’ संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली १६ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाशी प्रथम श्रेणी सामना खेळणार आहे. वस्तुत: अध्यक्षीय संघ ही भारताची तिसरी फळी आहे.

Story img Loader