ज्या कुरुक्षेत्रातल्या रणभूमीवर महाभारताचे युद्ध रंगले, त्याच कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या शाहबाद गावात एका गरीब कुटुंबात राणी रामपालचा जन्म झाला. वडील टांगाचालक आणि दोन भाऊ सुतारकाम करणारे. परिस्थिती तशी बेताचीच. जगण्यासाठी संघर्ष हे त्यांच्या पाचवीला पुजलेले. राणीने शिकून मोठं व्हावं, ही वडिलांची इच्छा, पण शिक्षणात तिचे मन कधीच रमले नाही. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बलदेव सिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य हॉकीला समर्पित केले आहे. त्यांच्याच शाहबाद हॉकी अकादमीत आपल्या मैत्रिणी हॉकी खेळायला जात असल्यामुळे राणीची पावलंही आपसूकच अकादमीकडे वळली. डोंगरदऱ्यातून, शेतातून दोन किलोमीटरचे अंतर चालत पार करायचे आणि हॉकीच्या मैदानावर आपले कसब पणाला लावायचे, हा तिचा नित्यक्रमच बनला होता. हॉकी अकादमी हे तिचे दुसरे घरच बनले होते.
हॉकीचे साहित्य आणि शूज घेण्याची तिची परिस्थिती नव्हती. अनवाणी पायानेच हॉकीचे धडे गिरवत तिने आपल्यातील गुणवत्ता दाखवून दिली. अन्य मुलींपेक्षा हॉकीचे तंत्र पटकन आत्मसात करण्याच्या वृत्तीमुळे ती सर्वाची लाडकी बनली होती. तिच्या गुणवत्तेवर खूश होऊन बलदेव सिंग यांनीच तिला हॉकी स्टिक आणि साहित्य दिले. मैदानावर घाम गाळून थकलेल्या अवस्थेत दोन किलोमीटर चालत जाऊन घर गाठणे कठीण जाऊ लागल्यानंतर तिने सायकल विकत घेतली. तिला घरच्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. तिच्याकडे लक्ष द्यायला फरस वेळ नसला तरी वडील काबाडकष्ट करून तिच्या प्राथमिक गरजा पुरवत होते.
वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यानंतर राणीने आपल्या खेळाने सर्वानाच अचंबित केले. २००९मध्ये बँकॉक येथील आशिया चषकात रौप्यपदक मिळवून देण्यात राणीने मोलाचा वाटा उचलला. अर्जेटिनात २०१०मध्ये झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत सात गोल करून स्पर्धेतील सर्वोत्तम युवा हॉकीपटूचा पुरस्कार तिने पटकावला. २०१० सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुरेख कामगिरी करून आशियाई हॉकी महासंघाच्या सर्वोत्तम स्थान तिने पटकावले. यंदा ती कारकिर्दीच्या शिखरावर आहे. राणीच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने जर्मनीतील मोंचेनग्लॅडबॅच येथील कनिष्ठ विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्याची करामत केली आहे.
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेची कांस्यपदकासाठीची लढत अतिशय चुरशीची झाली. यापूर्वी या स्पर्धेत भारताने कधीही पदकापर्यंत मजल मारलेली नव्हती. सुरुवातीलाच राणी रामपालने गोल करून भारताच्या कांस्यपदकाच्या आशा उंचावल्या, पण निर्धारित वेळेत इंग्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटून पेनल्टी-शूटआऊटपर्यंत गेला. पहिल्याच प्रयत्नात राणीने गोल करून भारताची आघाडी वाढवली. पाचही प्रयत्नांनंतर १-१ अशी बरोबरी कायम होती. राणीने पुन्हा यशस्वी गोल केल्यानंतर इंग्लडने बरोबरी साधली. सर्वाच्या नजरा नवनीत कौरवर खिळल्या होत्या. तिच्या गोलमुळे भारताचे कांस्यपदकाचे स्वप्न पूर्ण होणार होते. अखेर तिसऱ्या प्रयत्नांत नवनीत कौरने विजयी गोल करून भारताला कांस्यपदकावर मोहोर उमटवून दिली. भारताच्या युवा महिला संघाचे विश्वचषक स्पर्धेतील कांस्यपदकाचे स्वप्न पूर्ण झाले ते राणीच्या सुरेख कामगिरीमुळे..
मुलांच्या भवितव्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांचे दु:ख तिला कमी करावयाचे आहे. आपल्या कमाईवर घरचा चरितार्थ चालावा आणि आतापर्यंत कुटुंबासाठी घाम गाळणाऱ्या आपल्या वडिलांनी घरात बसून त्याचा आनंद लुटावा, ही तिची मनोमन इच्छा आहे. कनिष्ठ महिला विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या राणीवर बक्षिसांचा, अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. हरयाणा सरकारने तिच्यासमोर नोकरीचा प्रस्तावही ठेवला आहे. हॉकीच्या कुरुक्षेत्रावर ‘राणी’ ठरलेल्या भारतीय महिला संघ ऑलिम्पिकमध्ये कधीही पात्र ठरलेला नाही. कनिष्ठ संघाच्या या देदीप्यमान कामगिरीने भारताच्या आशा आता उंचावल्या आहेत. या संघातील सात जणी वरिष्ठ संघातूनही खेळतात. त्यामुळे येणारा काळ हा महिला हॉकी संघासाठीही सुखाचा ठरणार, याची झलक दिसू लागली आहे. राणी रामपालसारख्या अनेक ‘राणी’ गावागावातून, शहरातून पुढे येवोत आणि हॉकीतही ‘चक दे इंडिया’चा नारा घुमू दे, हीच अपेक्षा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा