ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला २०१२-१३ या वर्षांसाठी भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुंबईत ११ जानेवारीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी १ ऑक्टोबर २०१२ ते ३० सप्टेंबर २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
अश्विनने एकंदर ४३ बळी घेतले. यात चार वेळा डावांत पाच बळी आणि एकदा सामन्यात १० बळी घेण्याची किमया साधली. याचप्रमाणे ८ कसोटी सामन्यांत दोन अर्धशतकांसह २६३ धावा केल्या. १८ सामन्यांत एकदिवसीय त्याने २४ तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ३ बळी घेतले. सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२०१२-१३ या हंगामातील रणजी क्रिकेट स्पध्रेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल अभिषेक नायरला लाला अमरनाथ पुरस्कार देण्यात येणार आहे. नायरने ११ सामन्यांमध्ये ९६.६च्या एकंदर ९६६ धावा केल्या. सन्मानचिन्ह आणि अडीच लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वोत्तम सांघिक कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुरस्कार देण्यात येणार आहे. मुंबई संघाने रणजी करंडक, सी. के. नायडू करंडक (२५-वर्षांखालील), विजय र्मचट चषक (१६-वर्षांखालील), आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा (१९-वर्षांखालील महिलांसाठी) अशा विविध स्पर्धा जिंकल्या. दरम्यान, सर्वोत्तम पंच (स्थानिक क्रिकेट) पुरस्कार सी. शामसुद्दीन यांनी पटकावला.
तीन माजी क्रिकेटपटूंचा सन्मान
भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आर. जी. (बापू) नाडकर्णी, फारुख इंजिनीअर, स्वर्गीय एकनाथ सोलकर यांना बीसीसीआयकडून सन्मानचिन्ह आणि १५ लाख रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे.
‘‘बीसीसीआयकडून माझा सन्मान होईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. बीसीसीआयला उशिराने जाग आली असली तरी माझ्या छोटय़ाशा योगदानाची दखल घेतल्यामुळे मी आनंदी आहे. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे.’’
बापू नाडकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा