Ravichandran Ashwin breaks Shane Warne’s record: टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने ५ विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने ७ विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे त्याने सामन्यात एकूण १२ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे टीम इंडियाने यजमान वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर आश्विनने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा मोठा विक्रम मोडला.
रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्नचा विक्रम मोडला –
रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव जोमेल वॅरिकनला १८ धावांवर एलबीडब्ल्यू करून संपुष्टात आणला. यासह त्याने अनुभवी शेन वॉर्नचा विक्रम मोडला. त्याने २३व्यांदा कसोटी सामन्यातील शेवटची विकेट घेतली आणि कांगारूंच्या दिग्गजाला मागे टाकले. शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत २२ वेळा अशी कामगिरी केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २० ते २५ जुलै दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. रविचंद्रन अश्विन पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला त्या सामन्यात १४ विकेट्स घ्याव्या लागतील. एका कसोटी सामन्यात इतक्या विकेट्स घेणे सोपे नाही, पण डॉमिनिकातील अश्विनच्या कामगिरीवरून तो हे करू शकतो हेच दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये जगातील सध्याच्या नंबर १ गोलंदाजाने हे केले, तर तो ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज नॅथन लायनच्या आधी ५०० बळींचा टप्पा गाठेल.
हेही वाचा – LSG Team: लखनऊ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय, संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची केली निवड
नॅथन लायन विरुद्ध रविचंद्रन अश्विन –
नॅथन लायन दुखापतीमुळे २०२३ च्या अॅशेसमधून मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याने १२२ कसोटीत ४९६ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने ९३ कसोटीत ४८६ विकेट घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये लायन आठव्या तर अश्विन ९व्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे चौथ्या क्रमांकावर आहे. तो भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १३२ कसोटीत ६१९ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs WI 1st Test: यशस्वी जैस्वालचे हुकले द्विशतक, मात्र तिसऱ्या दिवशीही लावली ‘या’ विक्रमांची रांग
सामन्याबद्दल बोलायचे तर, पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनच्या घातक गोलंदाजीसमोर (५/६०) वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १५० धावांत आटोपला. प्रत्युत्तरात जैस्वालच्या (१७१) शतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिला ५ बाद डावात धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे पिछाडीवर पडलेल्या कॅरेबियन संघाचा दुसऱ्या डावात १३० धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला.