Ravichandran Ashwin Interview: विराट कोहलीनंतर जेव्हा टीम इंडिया कसोटी फॉर्मेटसाठी नेतृत्वाचा शोध घेत होती, तेव्हा रोहित शर्मा तुलनेने केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या इतर उमेदवारांमध्ये आघाडीवर होता. अगदी मोजक्या लोकांनी एक पाचवे नाव घेतले होते आणि ते म्हणजे रविचंद्रन अश्विन. जागतिक क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू व नंबर वन गोलंदाजाला यापूर्वीही कर्णधारपदाचा अनुभव आहे, तसेच त्याच्या क्षमतेवर कोणी शंका घेतली नव्हती. तरीही, त्याचे नाव क्वचितच समोर आले. आता यावर पहिल्यांदाच आश्विनने मौन सोडले आहे, आपल्याला का नाकारण्यात आले याविषयी अश्विनने स्पष्ट शब्दात मत मांडले आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने स्वतःला “ओव्हरथिंकर” म्हणून दिलेल्या टॅग विषयी भाष्य केले. अश्विनने यावेळी नावं ठेवणाऱ्यांवर सुद्धा तिखट शब्दात टीका करत म्हटले की, “जर इतर अनेक भारतीय खेळाडूंप्रमाणे मला आश्वासन देण्यात आले असते की तुला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये समान संधी देण्यात येईल तर मला ओव्हरथिंक (अतिविचार) करण्याची किंवा सतत अनिश्चित राहण्याची वेळच आली नसती. “
अश्विन म्हणाला की, “बर्याच लोकांनी माझे चुकीचे मार्केटिंग केले आणि मला असे सांगितले की मी अतिविचार करणारा आहे. ज्या व्यक्तीला सहज १५-२० सामने खेळण्याची संधी मिळेल त्याने मानसिकदृष्ट्या जास्त विचार करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला माहित आहे की त्यांना फक्त दोनच सामने मिळतील. तर तो अतिविचार करणारच. हा माझा प्रवास आहे. त्यामुळे माझ्यासाठी हेच आहे. जर कोणी मला सांगणार असेल, ‘तू १५ सामने खेळणार आहेस, तुझी काळजी घेतली जाईल, तू खेळाडूंसाठी जबाबदार आहेस , तू नेतृत्वाच्या भूमिकेत आहेस, तर मी जास्त विचार करणार नाहीच. म्हणजे मग मी ‘का’ च करू?”
खरंतर एखाद्याला न विचार करता ओव्हरथिंकर असा टॅग देऊन टाकणे हे अन्यायकारक आहे कारण प्रत्येकाचा वेगळा असा प्रवास आहे आणि त्यात लुडबुड करण्याची इतरांना गरज नाही. या टॅगमुळे तुझे नुकसान झाले आहे का असे विचारले असता अश्विन म्हणतो की, “भारताचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या वाट्याला आल्यावरच हा टॅग वापरण्यात आला. शिवाय अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही हे म्हटले आहे की, परदेशी कसोटीसाठी अश्विनचे नाव पत्रकात दिसत नाही.”
“म्हणजे अर्थात हा टॅग माझ्या विरोधात काम करण्यासाठी तयार केला गेला होता, बरोबर? आता त्यांना माझं नाव पत्रकात हवंय की नकोय हे माझ्या हातात नाही, मला कोणतीही तक्रार नाही, माझ्याकडे हातावर हात ठेवून बसण्यासाठी किंवा पश्चात्ताप करण्यासाठी वेळ नाही. मला कसलाच पश्चात्ताप नाही. “
हे ही वाचा<< “सगळ्या गोंधळात आता… “WTC Final मधून वगळल्यावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “खडकासारखं…”
दरम्यान,अश्विन आता २०२३ तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सचे नेतृत्व करत आहे आणि तो पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुन्हा राष्ट्रीय संघात सामील होईल.