Ravichandran Ashwin on Virat Kohli and Rohit Sharma: भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टी२० मालिका सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही टी२० विश्वचषक २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर या फॉरमॅटमध्ये खेळलेले नाहीत. रोहित आणि कोहली शेवटचे आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळले होते. त्यामुळे सध्यातरी ते टी२० मालिकेपासून दूर आहेत.
आयर्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत दौऱ्यात देखील त्यांनी सहभाग घेतला नाही. दोघांनीही वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भाग न घेतल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे. आता अश्विनने या दोन्ही खेळाडूंबद्दल बोलताना मोठे विधान केले आहे. रोहित आणि विराटचा २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टी२० मालिका न खेळण्याचा निर्णय का योग्य आहे, हे स्पष्ट केले.
कोहली आणि रोहित विश्वचषकाच्या तयारीसाठी टी२० मालिका खेळत नाहीत
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “५० षटकांनंतर २० षटकांचे क्रिकेट खेळणे सोपे नसते कारण, मानसिकतेत पूर्णपणे बदल होतो. कोहली आणि रोहित यांना त्यांचा खेळ चांगलाच माहीत आहे आणि ते दोघेही बराच काळ खेळत आहेत. या दोघांनी आतापर्यंत टी२० मध्ये न खेळण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने योग्य आहे. दोघेही सध्या त्यांच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत आहेत.”
स्टार फिरकीपटू पुढे बोलताना म्हणाला, “दोन्ही खेळाडू त्यांच्या अनुभवाचा उपयोग करत आहेत आणि त्यांना एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायचे आहे जे करणे पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे अशा स्थितीत फिटनेस हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण, वर्कलोड मॅनेजमेंट करणे आणि तेही विश्वचषकाआधी खूप गरजेचे आहे.”
आर. अश्विनने भारतीय फलंदाजीबद्दल काहीही सांगितले नाही, पण एकदिवसीय विश्वचषकातील गोलंदाजीबद्दल त्याने आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला की, “आपण भारतातील सगळ्याच फिरकीपटूंना ओळखतो. आमच्याकडे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल आहेत तसेच, फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आमचा बॅकअप आहे. जर वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर आमच्याकडे मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह ही तिकडी आहे. बुमराह जरी गेल्या एक ते दीड वर्षापासून खेळला नसला तरी तो तंदुरुस्त आणि लयीत आहे. सिराजने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी केली आहे, मला वाटत नाही की त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची संघात निवड होईल आणि हे नैसर्गिक आहे.”