IND vs AUS 4th Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील अंतिम सामना अहमदाबाद मध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील आज दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दरम्यान रविचंद्रन अश्विनने या सामन्यात चौथी विकेट घेत एक मोठा विक्रम केला आहे. अश्विनने टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे.
वास्तविक, या सामन्यात चौथी विकेट घेतल्यानंतर आर अश्विनने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक १११ विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता अश्विनने ४ विकेट्स घेऊन कुंबळेची बरोबरी केली आहे. आता कुंबळे आणि अश्विनचे १११ विकेट्स समान आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ११३ विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने या मालिकेत २२ विकेट घेतल्या –
विशेष म्हणजे या चार विकेट्ससह आर अश्विनने आतापर्यंत या मालिकेत २२ विकेट घेतल्या आहेत. त्याने नागपूर कसोटीत ८ विकेट, दिल्लीत ६ आणि इंदूरमध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत, तर आता अहमदाबाद कसोटीत ४ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे अश्विनने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत तो या कसोटीत आणखी विकेट घेऊ शकतो, त्यामुळे अश्विन कुंबळेचा विक्रमही मोडू शकतो.
ऑस्ट्रेलियाने ४०० धावांचा टप्पा पार केला –
सध्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत होत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ गडी गमावून ४१३ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा १८० धावांवर बाद झाला. सध्या नॅथन लायन ४ आणि टॉड मर्फी ४ धावांवर खेळत आहेत. मोहम्मद शमीने २ आणि जडेजाने १ बळी घेतला आहे.अशा स्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्वरीत रोखले नाही तर अवघड होऊ शकते.
हेही वाचा – IND vs AUS 4th Test: उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनचा धुमाकूळ; दोघांनी मोडला ६३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने मोडला ६३ वर्ष जुना विक्रम –
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतीय भूमीवर २०८ धावांची भागीदारी करून ६३ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. आजच्याच दिवशी ६३ वर्षांपूर्वी नॉर्म ओ’नील आणि नील हार्वे या जोडीने मुंबईत भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियासाठी २०७ धावांची भागीदारी केली होती. आता २०२३ मध्ये म्हणजेच ६३ वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी २०८ धावांची भागीदारी करून या दिग्गजांचा मोठा विक्रम मोडला आहे.