R Ashwin Retirement from International Cricket: भारताचा सर्वाेत्कृष्ट फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या रवीचंद्रन अश्विनने क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. अश्विनने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यानच निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या गाबा कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विनचा समावेश नव्हता. ही कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय फिरकीपटूने पत्रकार परिषदेत निवृत्तीची माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर अश्विनची एकूण संपत्ती किती आहे आणि तो क्रिकेटमधून किती कमाई करतो, जाणून घेऊया.
तामिळनाडूचा या चॅम्पियन क्रिकेटपटूने १४ वर्षांनंतर क्रिकेटला अलविदा केलं आहे. टीम इंडियासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळणारा अश्विन अनिल कुंबळेंनंतर देशातील सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. अश्विन फक्त गोलंदाज म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. एकाच कसोटी सामन्यात शतक आणि ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने ४ वेळा केला आहे.
रविचंद्रन अश्विनची २०२४ मध्ये एकूण संपत्ती १३२ कोटी रुपये आहे. त्याच्या अफाट संपत्तीमध्ये क्रिकेट कारकिर्दीचा सर्वाधिक वाटा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सामन्यांपासून तसेच आयपीएलमधील उत्पन्नाचा समावेश आहे. याशिवाय अश्विनचे अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती करतो, ज्यातून तो तगडी कमाई करतो.
बीसीसीआयकडून मिळणारा पगार
२०२२-२३ च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआयने अश्विनला अ श्रेणीतील खेळाडूंच्या यादीत ठेवले होते. या करारातून त्याला वार्षिक ५ कोटी रुपये वेतन मिळाले.
आयपीएलमधून होणारी कमाई
आर अश्विनच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात २००८ मध्ये झाली. पण २०१० मध्ये त्याने त्याच्या कॅरम बॉलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. २०१६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जनंतर त्याला रायझिंग पुणे सुपरजायंट्सने संघात घेतले. अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१८ मध्ये ७.६ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो संघाचा कर्णधार बनला. आता २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला ५ कोटी रुपये खर्चून संघात घेतले आहे. आता त्याला पुन्हा एकदा २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. CSK ने त्याच्यासाठी ९.७५ कोटींची बोली लावली.
चेन्नईमधील आलिशान घर
अश्विनने २०२१ मध्ये चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला होता. त्यांच्या घराची किंमत जवळपास ९ कोटी रुपये आहे. या घरात तो पत्नी प्रीती अश्विन आणि दोन मुलींसह राहतो.
हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा का केली?
अश्विनचं कार कलेक्शन
अश्विनला लक्झरी कारचाही शौक आहे. त्यांच्याकडे ६ कोटी किंमत असलेली रॉल्स रॉइस कार आहे. याशिवाय त्याच्या कार कलेक्शनमध्ये ९३ लाखांची Audi Q7 देखील आहे.
जाहिराती आणि ब्रँड्स
क्रिकेटच्या मैदानाबाहेर अश्विनने ब्रँड एंडोर्समेंट्समधून भरपूर कमाई केली. झूमकार, मूव्ह, myntra, मन्ना हेल्थ, बॉम्बे शेव्हिंग कंपनी, एअरस्टोक्रॅट बॅग्ज, कोलगेट, कोका-कोला आणि ओप्पो यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांशी जोडलेला आहे. याशिवाय तो जेन नेक्स्ट क्रिकेट अकॅडमीमध्ये युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करतो. याबरोबरच त्याची स्वत:ची एक मीडिया कंपनी आहे, ज्याचं नाव कॅरम बॉल्स आहे.