चेन्नई : राहुल द्रविड आणि गौतम गंभीर या दोघांची प्रशिक्षक म्हणून शैली पूर्णपणे भिन्न आहे. मात्र, ते आपापल्या जागी योग्य आहेत. द्रविड अधिक शिस्तबद्ध होते, तर गंभीर काहीसा निश्चिंतपणे आपले नियोजन आखतो, असा भारतीय क्रिकेट संघाच्या आजी-माजी प्रशिक्षकांतील फरक तारांकित फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सांगितला.
‘‘गंभीर कमालीचा निश्चिंत स्वभावाचा प्रशिक्षक आहे. दडपण हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसावा. ड्रेसिंग-रूममधील वातावरण चैतन्यदायी राहण्याकडे त्याचा अधिक कल असतो. संघाच्या सरावाच्या सुरुवातीला सकाळी सर्व खेळाडू एकत्र येऊन चर्चा करतात आणि नंतर आपल्या तयारीला सुरुवात करतात. या वेळी तुम्ही आलात तर ठीक, नाही आलात तर तुमच्याशिवाय सरावाला सुरुवात करू, अशी गंभीरची प्रवृत्ती आहे. तो कुणावर चिडत नाही. मात्र, द्रविड यांचे तसे नव्हते. त्यांना प्रत्येक खेळाडूचा चर्चेत सहभाग असायलाच हवा, त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूने आपले साहित्यच काय, तर पाण्याच्या बाटल्याही ठरलेल्या जागेवरच ठेवायला हव्यात, अशी त्यांची सूचना असायची. त्यांच्या कामात वेगळीच शिस्त होती. अर्थात, द्रविड यांच्याप्रमाणेच गंभीरनेही वागायला हवे असे नाही,’’ असे अश्विन म्हणाला.