Why R Ashwin Retired in IND vs AUS Mid-Series: बॉर्डर गावस्कर मालिका ऐन भरात असताना रवीचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला. गाबा कसोटी धुवांधार पावसामुळे अनिर्णित राहिली मात्र सामन्यात काय झालं यापेक्षा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला अश्विनचा निर्णय. ३८वर्षीय अश्विन सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितच्या बरोबरीने पत्रकार परिषदेत आला. मी तुमचा फार वेळ घेऊ इच्छित नाही, हा माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा दिवस असेल असं सांगत त्याने निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटनं मला खूप काही दिलं. असंख्य आठवणी आहेत. मी आताच सगळ्याबद्दल बोलू शकत नाही. माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे असं अश्विन म्हणाला. अवघ्या ५ मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करत अश्विनने रोहितला मिठी मारली. पत्रकारांचे आभार मानले आणि निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वीच निवृतीचा विचार डोक्यात असल्याचं अश्विनने कुटुंबीयांना सांगितलं होतं. घरच्यांनी त्याला विचार करण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, कोणाला संघात संधी मिळते आहे हे पाहून निर्णय घेण्याचं अश्विनने ठरवलं. मंगळवारी रात्री अश्विनने आपल्या घरच्यांना १८ डिसेंबर त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा दिवस असेल असं सांगितलं.

हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती, गाबा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सांगितलं त्याप्रमाणे रोहित जेव्हा पर्थमध्ये दाखल झाला तेव्हा त्याला अश्विनच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल कळलं. पिंक बॉल कसोटी खेळण्यापूर्वीच अश्विन निवृत्ती घेणार होता. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात फिरकीपटू म्हणून अश्विनला संधी मिळणार होती पण अखेरीस जडेजाला संधी देण्यात आली. गाबा कसोटीदरम्यान अश्विनने प्रत्येक खेळाडूला भेटून मालिकेच्या मध्यातच निवृत्ती घेत असल्याचा निर्णय सांगितला, ज्याने सर्वांनाच धक्का बसला, अशी माहितीही समोर आली आहे. अश्विनला मेलबर्न आणि सिडनी कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकली असती पण त्याचवेळेस संघ कोणत्या पद्धतीने विचार करत आहे, संघसंयोजन कसं असेल याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असावा.

हेही वाचा – Rohit Sharma on R Ashwin Retirement: “मी त्याला पिंक-बॉल कसोटीपर्यंत थांबण्याची विनंती केली…”, रोहित शर्माने अश्विनच्या निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा

रवींद्र जडेजाने गाबा कसोटीत चेंडूसह फारशी चांगली कामगिरी केली नसली तर फलंदाजीत मात्र त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जडेजाने राहुलबरोबर चांगली भागीदारी रचत ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर हा फिरकीपटू म्हणून अश्विनची जागा घेण्यााठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उपस्थित आहे.

३८ वर्षांचा अश्विनने यंदाच्या कसोटी सीझनमध्ये घरच्या मैदानावर बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. पण अश्विन अजूनही काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो असं त्याला वाटत. पण सध्याच्या घडीला फार कसोटी सामने नसल्याने आणि संघामध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळेल की नाही ही अनिश्चितता त्याचबरोबर त्याच्या गुडघ्याचं दुखणं, यामुळे अश्विनने निवृत्तीचा निर्णय अखेरीस जाहीर केला.

हेही वाचा – India vs Australia 3rd Test Drawn: गाबा कसोटीत पावसाचाच खेळ, कसोटी अनिर्णित; मालिका बरोबरीतच

निवृत्तीच्या घोषणेनंतर अश्विन १८ डिसेंबरला मायदेशी परतणार आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे अश्विन देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध रणजी ट्रॉफी तमिळनाडूसाठी जिंकणं हे स्वप्न असल्याचं त्याने मागे सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित आता हे स्वप्न पूर्ण करायचा तो प्रयत्न करेल. याचबरोबर आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin retirement what made ravichandran ashwin retire in the middle of the border gavaskar series ind vs aus bdg