R Ashwin Big Revealation About Test Retirement and MS Dhoni: आयपीएल २०२५ येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारीला सुरूवात केली आहे. यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. ज्यामध्ये अनेक खेळाडू आपल्या पूर्वीच्या संघांमध्ये परत गेले आहेत. यामध्ये आर अश्विन पुन्हा एकदा सीएसकेच्या जर्सीमधून खेळताना दिसणार आहे. यादरम्यान अश्विनने आयपीएलपूर्वी त्याच्या कसोटी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने खुलासा केला की तो त्याचा १०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्त होणार होता, पण एम एस धोनीमुळे तो निवृत्त होऊ शकला नाही. मार्च २०२४ मध्ये धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात अश्विनने कसोटी क्रिकेटमधील त्याचा १०० वा सामना खेळला. यानंतर आर अश्विनने १८ डिसेंबर २०२४ रोजी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.

आर अश्विनने सांगितले की, त्याने एमएस धोनीला त्याच्या १००व्या कसोटीसाठी धरमशाला येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. या खास प्रसंगी धोनीने त्याला स्मृतीचिन्ह द्यावे अशी त्याची इच्छा होती. मात्र या सामन्यासाठी धोनी येऊ शकला नाही. अश्विनने खुलासा केला की तो त्याच दिवशी त्याला आपला अखेरचा सामना खेळायचा होता, पण तसं होऊ शकलं नाही.

आर अश्विन त्याच्या १०० व्या कसोटीचा प्रसंग सांगताना म्हणाला, “धरमशालामधील माझ्या १०० व्या कसोटीसाठी मी एम एस धोनीला बोलावले होते. त्याने मला १०० व्या कसोटीचं स्मृतिचिन्ह द्यावं अशी माझी इच्छा होती आणि तोच सामना मला अखेरचा कसोटी सामना म्हणून खेळायचा होता, पण धोनी येऊ शकला नाही. पण मला माहित नव्हतं की तो मला चेन्नई सुपर किंग्स संघात पुन्हा येण्याची संधी देत याचं गिफ्ट देईल. हे गिफ्ट खूप कमाल आहे. मला पुन्हा सीएसके संघात सामील केल्याबद्दल धन्यवाद एम एस… संघात पुन्हा येऊन खूप छान वाटतंय”

यादरम्यान बोलताना अश्विनने त्याच्या सीएसकेमधील पहिल्या सीझनच्या आठवणींना उजाळा दिला आणि पहिल्याच सीझनमध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल तो नेहमीच धोनीचा ऋणी राहिल. अश्विन पहिल्या सीझनबद्दल सांगताना म्हणाला, “२००८ मध्ये मी सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये मॅथ्यू हेडन, धोनी अशा महान खेळाडूंना भेटलो. मी २००८ मध्ये पहिल्यांदा खेळलो तेव्हा मी एक गोलंदाज होतो. मुथय्या मुरलीधरनसारखे खेळाडू संघात असताना माझ्यासारखा खेळाडू कुठे खेळणार होता.”

धोनीचे आभार मानत अश्विन पुढे म्हणाला, “धोनीने मला ज्या संधी दिल्या आणि माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी त्याचा आयुष्यभर ऋणी आहे. त्याने मला ख्रिस गेलला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि १७ वर्षानंतर अनिल भाई देखील त्याबद्दलचं बोलत आहेत.”

आर अश्विन आठ सीझननंतर यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा सीएसकेच्या संघात सामील झाला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अश्विन सीएसकेच्या संघात होता. चेन्नईने आयपीएल २०२५ च्या लिलावात ९.७५ कोटींची बोली लावत त्याला संघात सामील केले.

Story img Loader