Who Called R Ashwin After Retirement Cricketer Shares Call Log Picture: भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्क दिला. पण अशी तडकाफडकी अश्विनने निवृत्ती जाहीर केल्याने अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या भारताच्या निवृत्तीची बातमी येताच क्रिकेट जगतातील काही मोठ्या नावांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण काही दिग्गज क्रिकेटपटूंनी मात्र थेट व्हीडिओ कॉल आणि कॉल करून त्याला शुभेच्छा दिल्या. याचा फोटो अश्विनने शेअर करत एक खास कॅप्शन दिलं आहे.
सोशल मीडियावर अश्विनच्या उत्कृष्ट कारकीर्दीसाठी त्याचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट आणि मेसेजचा पूर आला होता. चेन्नईमध्ये परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं जंगी स्वागत केलं तर यावेळेस त्याचे आई-वडिलदेखील भावुक झाले होते. निवृत्तीच्या दिवशी भारताचे दोन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांनी त्याला कॉल केला होता, हे त्याने पोस्ट शेअर करत सांगितले आणि त्यांचे आभारही मानले.
अश्विनने त्याच्या कॉल लॉगचा स्क्रिनशॉट एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने त्याला व्हीडिओ कॉल केला होता. तर कपिल देव यांनी त्याला कॉल करून त्याच्या निवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या. अश्विनने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटले, जर २५ वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की, तुझ्याकडे स्मार्ट फोन असेल आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकीर्दीच्या अखेरच्या दिवशी माझा कॉल लॉग असा असेल तर हे ऐकून मला ह्रदयविकाराचा झटका आला असता. सचिन पाजी आणि कपिल देव पाजी तुमचे खूप खूप आभार.
हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
अश्विनच्या निवृत्तीवर कपिल देव भावुक झाले होते आणि एका मुलाखतीत त्यांनी अश्विनच्या निवृत्तीवर वक्तव्य करताना म्हणाले, “पुढची पिढी आपल्यापेक्षा चांगली असावी. तसं नाही झालं तर जगाची प्रगती होणार नाही. सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर यांच्या विक्रमांची बरोबरी करत त्यांच्याजवळ कोणी जाऊ शकेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण आज आपल्याकडे राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू आहेत. आजचे खेळाडू खूप पुढे आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांची खेळण्याची पद्धत अनोखी आहे, ज्याची तुम्हीही प्रशंसा करता. पण आता अश्विनने क्रिकेटला अलविदा केलं आहे. पण मी तिथे असतो तर त्याला असं कधीच जाऊ दिलं नसतं. मी त्याला मोठ्या आदराने आणि आनंदाने निरोप दिला असता.”
सचिन तेंडुलकर आणि अश्विन भारताच्या एकाच कसोटी संघात दोन वर्ष एकत्र खेळले आहेत. याशिवाय २०११ च्या वनडे विश्वचषक संघातही हे दोन्ही खेळाडू होते. आर अश्विनने भारताचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली. या यादीत पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहेत. तर अश्विनने त्याच्या कारकीर्दीत एकूण ५३७ विकेट घेतले आहेत.