R Ashwin overtakes Muthaya Muralitharan: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी डॉमिनिका येथे खेळली गेली. या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि १४१ धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेतल्या. या विकेट्ससह अश्विनने श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला मागे टाकत अतिशय खास विक्रम केला.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १२ किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने सहाव्यांदा ही कामगिरी केली आहे. त्याच वेळी, श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू मुथय्या मुरलीधरननेही आपल्या कारकिर्दीत सहा वेळा १२ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. परंतु, मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये हा आकडा गाठला होता. आता अश्विनने हा आकडा केवळ ९३ कसोटी सामन्यांचा गाछला. अशा प्रकारे अश्विनने मुथय्या मुरलीधरनचा मागे टाकले आहे.
याशिवाय अश्विनने या कसोटीत ७०० आंतरराष्ट्रीय विकेट्सही पूर्ण केल्या. कसोटी सामन्याच्या अखेरीस त्याने ७०९ आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. यासह तो हरभजन सिंगला मागे टाकत भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. हरभजन सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७०७ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे ९५३ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियाने डब्ल्यूटीसीमध्ये पटकावले अव्वलस्थान, ऑस्ट्रेलिया संघाला बसला फटका
अश्विनची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
आर अश्विनने आतापर्यंत ९३ कसोटी, ११३ वनडे आणि ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने २३.२१ च्या सरासरीने ४८६ विकेट्स घेतल्या आहेत आणि बॅटने २६.९६ च्या सरासरीने ३१२९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.५च्या सरासरीने १५१ विकेट्स घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने २३.२२ च्या सरासरीने ७२ विकेट्स घेतल्या आहेत.