R Praggnanandhaa Wins Tata Steel Chess Masters Title: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने २ फेब्रुवारी २०२५ रोजी नेदरलँड्समध्ये झालेल्या रोमहर्षक टायब्रेकमध्ये वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशचा पराभव करून टाटा स्टील मास्टर्स २०२५ चे जेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावत आर प्रज्ञानंदने इतिहास घडवला. २००६ मध्ये विश्वनाथन आनंद नंतर टाटा स्टील चेस मास्टर्स जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. स्टील मास्टर्स विजेत्या प्रज्ञानंदने टायब्रेकरमध्ये विश्वविजेत्या डी गुकेशचा २-१ असा पराभव केला.
आर प्रज्ञानंदा आणि डी गुकेश यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला, जिथे १३वी आणि अंतिम फेरी पूर्ण केल्यानंतर, दोघांचे गुण ८.५ होते. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना रंगला, जिथे दोन्ही युवा खेळाडू प्रत्येक टायब्रेकर सामना जिंकत होते.
गुकेश शेवटच्या फेरीपर्यंत अपराजित होता,पण जेव्हा तो ग्रँडमास्टर अर्जुन इरिगसीविरूद्ध ३१ व्या चालीमध्ये पराभूत झाला. हा जागतिक विजेता म्हणून गुकेशचा प्रथमच पराभव होता. तर प्रज्ञानंदाचा व्हिन्सेंट कीमरने पराभव केला. रविवारी गुकेशने दोन गेमच्या ब्लिट्झ टायब्रेकरचा पहिला गेम जिंकला. गुकेशला या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी दुसऱ्या ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये फक्त ड्रॉची गरज होती. पण प्रज्ञानंदाने उत्कृष्ट पुनरागमन करत दोन्ही ब्लिट्झ गेम जिंकले आणि विश्वविजेत्या गुकेशचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
टाटा स्टील चेस मास्टर्सचे जेतेपद पटकावल्यानंतर प्रज्ञानंद म्हणाला, “कदाचित अर्जुनसाठी काहीतरी केले पाहिजे. मला खरोखर अपेक्षा नव्हती की अर्जुन गुकेशला पराभूत करेल, कारण गुकेश खरोखरच चांगला खेळत होता. जेव्हा मी गुकेश विरुद्ध अर्जुनच्या सामन्याचा निकाल पाहिला तेव्हा मी आधीच सामन्यात चूक केली होती हे मला जाणवलं आणि मी इतक्या कठीण स्थितीत होतो की मी गुकेशविरूद्ध सामन्यात बचाव करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नव्हतो. मला ज्या परिस्थितीत खेळणार होतो तेव्हा माझ्यासमोर कोणतीही संधी आहे असे मला व्यावहारिकदृष्ट्या वाटत नव्हते”
याबरोबर तो पुढे म्हणाला की, मी इथे आलो तेव्हा मला ही स्पर्धा जिंकायची होती. पण स्पर्धा खूपच तगडी होती. कालपर्यंत मी याबद्दल फारसा विचार केला नव्हता. हे सर्व शब्दात मांडण्यासारखं नाही… मी खूप आनंदी आहे.