R Praggnanandhaa:टाटा स्टील मास्टर्स इव्हेंटमध्ये जगज्जेता बुद्धिबळपटू डिंग लिरेनला प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत हरवलं. त्यानंतर आता लाइव्ह रेटिंगमध्ये प्रज्ञानंद विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत देशाचा क्रमांक एकचा भारतीय ग्रँडमास्टर झाला आहे. प्रज्ञानंदने मागच्या वर्षीही याच स्पर्धेत डिंग लिरेनला हरवलं होतं. काळ्या मोहऱ्यांसह शानदार बुद्धिबळाचा खेळ करत त्याने डिंग लिरेनला हरवलं. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
प्रज्ञानंदच्या या कामगिरीनंतर उद्योजक गौतम अदाणी यांनी एक्स पोस्ट करुन त्याचं अभिनंदन केलं आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशा शब्दात अदाणी यांनी प्रज्ञानंदचं कौतुक केलं आहे. डिंग लिरेन हा चीनचा बुद्धिबळपटू आणि सध्याचा जगज्जेता खेळाडू आहे. त्याला हरवून तू जी कामगिरी केलीस त्याबद्दल आम्हाला तुझा गर्व वाटतो या आशयाची पोस्ट गौतम अदाणी यांनी केली आहे.
आपल्या देशाचं मी जागतिक स्तरावर चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करु इच्छितो. मी जेव्हा खेळतो आणि जिंकतो तेव्हा तो मला माझ्यापेक्षाही आपल्या देशाचा मोठा सन्मान वाटतो. मी माझ्या क्षमता ओळखून आहे. तसंच मला मदत करणाऱ्या अदाणी समूहाचेही मी आभार मानतो असं प्रज्ञानंदने म्हटलं आहे.
२०२३ मध्ये प्रज्ञानंद बुद्धिबळ स्पर्धेच्या जागतिक चषक स्पर्धेत पोहचणारा सर्वात कमी वयाचा भारतीय बुद्धिबळपटू होता. २०२२ मध्ये प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला हरवलं होतं त्यामुळे तो चर्चेत आला होता. आता त्याने डिंग लिरेनचा पराभव केला आहे.