टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हटले जाते. कारण धोनीने अनेक कठीण प्रसंगात ज्या पद्धतीने संघाला शांतपणे हाताळले, त्याचे उदाहरण आजपर्यंत दिले जाते. त्यामुळे सगळ्यांना वाटते धोनीला राग येत नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावर धोनीच्या रागाचे काही किस्से पण आहेत. टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या ‘कोचिंग बियॉन्ड’ या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे.
एकदा टीम इंडियाच्या विजयानंतरही कॅप्टन धोनी संतापला होता आणि त्याने संपूर्ण टीमला अल्टिमेटम दिला होता. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुधारण्यात धोनीचा मोठा हात असल्याचे मानले जाते. २०११ मध्ये जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, तेव्हा संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच चांगले होते. श्रीधरने सांगितलेला किस्सा २०१३ चा आहे, जेव्हा धोनी वनडे आणि टी-२०फॉरमॅटमध्ये कर्णधार होता.
श्रीधर यांनी पुस्तकात लिहिले की, ”टीम इंडियासोबतच्या माझ्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे… ऑक्टोबर २०१४ मध्ये आम्ही दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत होतो. आम्ही तो सामना आरामात जिंकला, पण त्या सामन्यात संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. यावर धोनी चांगलाच संतापला होता.”
हेही वाचा – Sam Curran Fined: IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूला ICCने ठोठावला दंड; टेंबा बावुमाविरुद्धची ‘ती’ कृती भोवली
त्या मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर होता आणि दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला, जो भारताने ४८ धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. भारताने चार सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील एक सामना रद्द झाला. सामना संपल्यानंतर धोनी खूपच निराश आणि संतप्त दिसत होता.
हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी!
धोनी म्हणाला होता, ”मला वाटते काही गोष्टी गहाळ आहेत, आपल्याला तयारी करावी लागेल, आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. हा सामना आमच्यासाठी डोळे उघडणारा होता. आम्ही जिंकलो, पण हा सामना आमच्या हातातूनही निसटला असता.” श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ”धोनीने ड्रेसिंग रूममध्ये सर्वांची शाळा घेतली आणि सर्वांना अल्टिमेटम दिला होता. धोनीने स्पष्टपणे सांगितले होते की, जर एखादा खेळाडू फिटनेस आणि क्षेत्ररक्षणाच्या विशिष्ट मानकांमध्ये अपयशी ठरला, तर तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही.”