पीटीआय, आइल ऑफ मॅन (ब्रिटन)
भारताच्या आर. वैशालीने ‘फिडे’ महिला ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत युक्रेनची माजी जागतिक विजेता मारिया मुजिचुकला नमवत ३.५ गुणांसह संयुक्तपणे शीर्ष स्थानी पोहोचली आहे. स्पर्धेच्या अजूनही सात फेऱ्या शिल्लक आहेत. वैशालीशिवाय चीनची टेन झोंगयी, युक्रेनची अॅना मुजिचुक आणि कझाखस्तानची असोबायेवा बिबिसारा संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहेत.
ग्रँडमास्टर प्रज्ञानंदची बहीण असलेल्या वैशालीने नुकत्याच झालेल्या कतार मास्टर्समध्ये आपला तिसरा व अखेरचा ग्रँडमास्टर ‘नॉर्म’ मिळवला. चेन्नईच्या या खेळाडूने आपल्या आक्रमक शैलीने मुजिचुकला २३ चालींमध्ये नमवले. युक्रेनची खेळाडू वैशालीसमोर पुनरागमन करण्यात अपयशी ठरली. चार फेऱ्यांमध्ये वैशालीचा हा तिसरा विजय आहे. खुल्या गटात ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने सर्बियाच्या अॅलेक्झांडर प्रेडकेविरुद्ध बरोबरीची नोंद केली. डी हरिका व तानिया सचदेव यांना पराभूत व्हावे लागले. दिव्या देशमुखने बरोबरीची नोंद केली तर, वंतिका अग्रवालने चिलीच्या जेविएरा बेलेन गोमेज बारेराचा पराभव केला.
ग्रँडमास्टर विदित गुजराथीने आपली विजयी लय कायम राखताना स्पेनच्या अॅलेक्सी शिरोवला नमवले. विदितचा हाल्लग तिसरा विजय आहे. ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेन्को खुल्या गटात शीर्ष स्थानी आहे. एसिपेन्कोने फ्रान्सच्या मार्क आंद्रिया मोरिजीला नमवले. डी गुकेश मात्र, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. सर्बियाच्या इवान सारिचविरुद्ध त्याने सलग चौथ्या बरोबरीची नोंद केली. पी हरिकृष्णाने ब्रिटनच्या श्रेयस रॉयलला पराभूत केले. निहाल सरीनने अर्मेनियाच्या सेमवेल टेर-सहाकयानला नमवले तर, प्रज्ञानंदने तुर्कीच्या मुस्तफा यिलमाजविरुद्ध बरोबरीची नोंद केली.